गैरसमजातून पकडलेल्या तरुणाला दिला योग्य न्याय…
अमळनेर:- नागरिकांच्या सतर्कतेने घरफोडी होण्यापासून वाचली मात्र गैरसमजातून नागरिकांनी पकडलेला तरुण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे आणि सतर्कतेमुळे चोरीचा गुन्हा दाखल होण्यापासून वाचला. परंतु चुकीला माफी नाही म्हणत त्याच्या गैरवर्तनाची शिक्षा त्याला देण्यासही पोलीस विसरले नाहीत.
१८ जून रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास सुनंदा पार्क ,भालेराव नगर भागात एक घरात कुटुंब झोपलेले असताना चोरांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला. त्या कुटुंबाने शेजारी राहणाऱ्या चंद्रकांत कंखरे या शिक्षकाला सांगितले की आमच्या घरात चोरी होत आहे. कंखरे यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र बाहेरून कडी असल्याने ते निघू शकले नाहीत म्हणून त्यांनी कॉलनीतील काही लोकांना फोनवर कळवले. लोक बाहेर पडले अन चोर पळाले. पोलिसही घटनास्थळी पोहचले मात्र त्यांना चोर मिळून आले नाहीत. थोड्या वेळाने तीन जण मोटरसायकलने आरामात जाताना दिसल्याने कंखरे याना ते चोर असल्याचा संशय आला. त्यांनी मोटरसायकल क्रमांक पोलिसांना दिला. पोलिसांनी शोध घेतला पोलिसांना तीन संशयित आढळून आले. त्यात एक बाहेरगावचा आणि उघड्या स्थितीत आढळला. तो संशयित शिंदखेडा येथील होता. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तो संशयित दारूच्या नशेत आपल्या मेव्हण्याच्या घराची कडी ठोकत होता. खड्ड्यात पडल्याने त्याला किरकोळ जखम झाली होती. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी संबंधित तरुणाची मोटरसायकल ताब्यात घेतली. त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. मात्र त्याने घातलेल्या गोंधळाची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे म्हणून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सतर्कतेने चोरी थांबली मात्र गैरसमजुतीतून सापडलेल्या संशयित तरुणाला देखील चुकीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी योग्य प्रक्रिया पोलिसांनी राबवली.