अमळनेर:- तालुक्यातील विविध शाळा, कार्यालय व सामाजिक संस्थांकडून जागतिक योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पतंजली योगपीठमार्फत दहावा जागतिक योग महोत्सव महिला योग साधकांच्या मार्फत साजरा करण्यात आला. याप्रसंगी ‘महिला सशक्तीकरणासाठी योग साधना’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक गजानन माळी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना योग साधनेचे आयुष्यातील महत्त्व व महिलांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याच्या माध्यमातून महिला सशक्तिकरणामध्ये मोलाचे ठरेल असे सांगितले. याप्रसंगी विविध योगासनांची व प्राणायामचे प्रात्यक्षिक उपस्थित महिला साधकांनी केलीत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रभारी ज्योती पाटील, तालुका प्रभारी रत्ना भदाणे , योगशिक्षिका कामिनी पवार, आरती पाटील, सविता पाटील आदींनी परिश्रम घेतले तर उपस्थित योग साधकांमध्ये प्रमुख योगसाधक प्रतिभा पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा शिंदे यांचेसह महिला योग साधक यावेळी उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमास खा. स्मिता वाघ व संदिप घोरपडे यांचे सहकार्य लाभले. रत्ना भदाणे यांनी आभार मानले.
तालुका विधी सेवा समितीतर्फे योग दिवस साजरा
अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी बेलीफ रघुनाथ चौधरी यांनी कर्मचाऱ्यांचे योगाचे प्रशिक्षण घेतले. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश, न्यायिक अधिकारी, लिपिक, स्थानिक कर्मचारी, वकील, वकील संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
जी.एस.हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मिळाले योगाचे धडे
शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे २१ जून रोजी योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी क्रीडा शिक्षक एस.पी.वाघ,के.आर.बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले.यावेळी विद्यार्थ्यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके केली. यावेळी मुख्याध्यापक बी.एस. पाटील, उपमुख्याध्यापक ए.डी. भदाणे, पर्यवेक्षक एस.आर. शिंगाने, सी.एस.सोनजे,जेष्ठ शिक्षक के.पी. पाटील, पी.एस.काटकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल योग दिन मोठ्या उत्साहात साजरा….
शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे 21 जून रोजी १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, व उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, माजी प्राचार्य एस आर चौधरी हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन डी डी पाटील होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी योग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी योगशिक्षक गजानन माळी हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांकडून अनेक पद्धतीचे योगासने करून घेतले. यात शाळेतील महिला शिक्षिका, पुरुष शिक्षक तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या भाषणाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्त्व समजावून सांगितले. प्रमुख पाहुण्यांचे आभार शिक्षिका सीमा साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने करण्यात आली.
मारवड महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत योग दिन साजरा…
तालुक्यातील मारवड येथील कै.नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात दि.21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. देसले उपस्थित होते. योग दिन मार्गदर्शक प्रा. डॉ. पवन पाटील यांनी योग दिन संदर्भात मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन प्रा. डॉ.जितेंद्र माळी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले. यावेळी महाविद्यालयीन प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सरस्वती विद्या मंदिर येथे योग दिवस साजरा…
अमळनेर येथील सरस्वती विद्या मंदिर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस विद्यार्थी व शिक्षकांनी योग प्रात्यक्षिक करून साजरा केला. मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात योगाचे महत्त्व व योगक्रियांच्या माध्यमातून होणारा विकास याबद्दलची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. तर याप्रसंगी उपशिक्षक ऋषिकेश महाळपुरकर यांनी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक आनंदा पाटील, धर्मा धनगर, शितल पाटील आदिंनी परिश्रम घेतले.