उद्यानात हिरवेगार नंदनवन साकारल्याने मंत्री पाटील यांचा केला नागरी सत्कार…
अमळनेर:-चला योगा करूया या, आयुष्य वाढवू या, या संकल्पनेनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने दि 21 जुन रोजी सकाळी 6.30 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन महोत्सव उत्साहात पार पडला.विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनीही पूर्णवेळ योगा करून उपस्थितांचा उत्साह वाढविला.
तसेच 80 लक्ष निधीतून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचा कायापालट करून हिरवेगार नंदनवन साकरल्याने मंत्री पाटील यांचा भव्य नागरी सत्कार देखील यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे खासदार स्मिता वाघ अनुपस्थित राहिल्या तरी त्यांनी आपल्या शुभेच्छा कळविल्या. तसेच अमळनेर नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी तुषार नेरकर हे देखील उपस्थित होते. दि जळगाव जनता सहकारी बँक लि.जळगाव ,शाखा अमळनेर हे सदर कार्यक्रमाचे प्रायोजक होते.सदर महोत्सवात पुणे येथून प्रशिक्षित झालेल्या योग प्रशिक्षिका अमळनेरच्या सुपुत्री कु.वैशाली महेशकुमार तोलानी योगा बद्दल अनमोल मार्गदर्शन करत उपस्थितांकडून योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले.सुमारे तासभर त्यांनी हसतखेळत प्रात्यक्षिक करत सर्वांचा अक्षरशः घाम काढला.कोणत्या आजारावर कोणते आसन उपयुक्त याबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केले. निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक हिरव्यागार गालिच्यावर हा महोत्सव झाल्याने अतिशय मनमोहक वातावरण निर्माण झाले होते.प्रार्थनेने योगाचा समारोप झाला.
कु.वैशाली कोराणी अमळनेरकरांचा अभिमान-मंत्री अनिल पाटील…
मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेरकरांच्या कु.वैशाली कोराणी हिचा विशेष सत्कार करत सिंधी समाजातील असलेली ही कन्या संपूर्ण अमळनेरसाठी अभिमान असल्याचे सांगितले.तसेच गार्डन गृपने या कन्येला प्रोत्साहन देऊन एक प्रकारे सन्मान केला असून ग्रुप सह तिची ही योग सेवा अनेकांचे आयुष्य वाढविणारी असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच छत्रपती शिवाजी महाराज उद्यानास नवीन रूप देण्याची संधी आपल्याला मिळाली हे माझे भाग्य असून माझ्या या भूमीसाठी विकासात्मक दृष्ट्या जास्तीत जास्त चांगले करण्याचा प्रयत्न केला आहे,शहराच्या चारही बाजूला असेच उद्यान साकारण्याचा आपला प्रयत्न असून लवकरच छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात सोलर दिवे, ओपन जिम साहित्य,व बालकांसाठी खेळणी उपलब्ध करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
जेष्ठ नागरिकांचा वडाचे रोप देऊन सत्कार…
21 जून रोजी वटपौर्णिमा असल्याने पारस गोल्ड पेढीच्या वतीने वडाची रोपे उपलब्ध झाल्याने ती रोपे देऊन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते उद्यानात व्यायामासाठी नियमित येणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.यात प्रा डॉ ए जी सराफ,प्रकाशचंद पारेख,प्रेम भाई शाह,नरेंद्र दोढीवाला,ऍड एस एस ब्रह्मे,सिद्धार्थ सोनवणे,रघुनाथ पाटील, संतोष आप्पा पाटील, आबा मराठे,वीरेंद्र वाधवानी, नितीनकुमार शाह, आदींचा सन्मान करण्यात आला.
तर या महोत्सवासाठी जळगाव जनता सहकारी बँकेचे प्रायोजकत्व मिळाल्याबद्दल अमळनेर शाखाधिकारी महेश गर्गे आणि विशेष सहकार्य करणारे उद्योजक गोविंद अग्रवाल यांचा विशेष सत्कार मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पुरुष बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, यावेळी न प चे मुख्याधिकारी तुषार नेरकर, खा. शि. मंडळाचे संचालक विनोदभैय्या पाटील,डॉ अनिल शिंदे,माजी कार्याध्यक्ष जितेंद्र जैन,माजी प्राचार्य डॉ.पी आर शिरोडे,भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,व्यापारी आघाडीचे बापू हिंदुजा,मनोज जीवनांनी,प्रसाद शर्मा यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले तर आभार उज्वला शिरोडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुप व जळगाव जनता सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.