चुकीच्या नोंदींबाबत बिघाड झाल्याने वरिष्ठांना कळवण्यात येणार असल्याची माहिती…
अमळनेर:- महावेधच्या पर्जन्यमापक यंत्रांच्या देखभाल दुरुस्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अमळनेर तालुक्यातील तीन मंडळांच्या केंद्रांना भेटी दिल्या. चुकीच्या नोंदींबाबत ऑनलाईन बिघाड झाल्याने याबाबत वरिष्ठांना कळवण्यात येणार आहे.
१७ जून रोजी झालेल्या पावसाची नोंद महसूल विभागाच्या शिरूड मंडळाच्या पर्जन्यमापकात ८१ मिमी नोंद झाली तर महावेधच्या ऑनलाईन नोंदीत पावसाची नोंदच नव्हती. त्याचप्रमाणे महसूल आणि महावेधच्या नोंदीत मोठी तफावत आढळून आली. भविष्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदत व अनुदानाबाबत अडचणी निर्माण होतील म्हणून शेतकरी नेते प्रा सुभाष पाटील, सुरेश पाटील, डॉ अनिल शिंदे, धनगर पाटील यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यानुसार महावेधचे अधिकारी नितीन पाटील यांनी शिरूड पर्जन्यमापक यंत्रणास्थळी भेट दिली. यावेळी शेतकरी नेते प्रा सुभाष पाटील व शेतकरी हजर होते. तसेच त्यांनी भरवस, वावडे केंद्रांना भेटी देऊन तेथील पर्जन्यमापक यंत्रांची साफसफाई केली. २३ रोजी तालुक्यातील उर्वरित पाच केंद्रांना भेटी देऊन त्यांची देखील दुरुस्ती करणार आहेत.