शिक्षक मतदार संघ निवडणूकीतील भेटवस्तू बाबत शासनाकडून कारवाई होणार…
अमळनेर:- नाशिक विभाग शिक्षक मतदार संघावर निवडणूक आयोगाने लक्ष घातले असून अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांनी तीन पथके नेमून विविध शाळांना अचानक भेटी देऊन ‘भेटवस्तू’ संदर्भात चौकशी केली.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात शिक्षक मतदारांना पैठणी, ड्रेस, नथ, रोख रक्कम याबाबत अमिष दाखवले जात असून शाळामध्ये भेटवस्तू वाटप केले जात असल्याचा आरोप हेरंब कुलकर्णी सह अनेकांनी केला होता. याबाबत निवडणूक आयोगाने परिपत्रक काढले आहे. तर जळगाव जिल्हा शिक्षणाधिकारीनी शिक्षकांना भेट वस्तू न स्वीकारण्याचे आवाहन करून शाळेत असे प्रकार घडल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
अमळनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी शाळा तसेच मतदार संघाच्या परिसरात तीन पथके नियुक्त करून शाळांना अचानक भेटी दिल्या. शाळांची तपासणी करून शिक्षकांकडे चौकशी केली व कोणी भेटवस्तू देण्यास आले तर आम्हाला कळवावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी केले आहे.
सोन्याची नथ १९ कॅरेटची ?
शिक्षक म्हणजे चिकित्सक वृत्ती एखाद्या गोष्टीत खोलवर नाही गेला तर तो शिक्षक कसला. एका उमेदवाराकडून मिळालेली नथ सोन्याची आहे का ? तिची किंमत किती ? याची चौकशी सरळ सोन्याच्या दुकानावर करण्यात आली. नथ १९ कॅरेटची असून त्याची किंमत आणि मोड मध्ये किती रुपयाला घेतली जाईल, याची माहिती घेऊन आपल्या मित्रांना कळविल्याच्या चर्चा आहेत.