अमळनेर:- कर्मचारी सेवानिवृत्त झाला की त्याचा कार्यालयातील रुबाब संपतो निवृत्तीनंतरच्या रकमा मिळाल्या नाहीत तर जीवन जगणेही कठीण होते. अधिकारी बदलत राहतात आणि मागचे काम म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणल्या आणि तब्बल एक कोटी ३७ लाख ७० हजार ८० रुपयांचे सेवानिवृत्त उपदान आणि सातव्या वेतन आयोगाचा फरक देखील दिल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
२०१६ ते २०२१ दरम्यान अमळनेर नगरपरिषदेतून सुमारे १४२ कर्मचारी निवृत्त झाले होते. त्यात सफाई कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या कर्मचाऱ्यांचे सेवनिवृत्तीचे उपदान आणि सातव्या वेतन आयोगातील फरक देखील बाकी होता. निवृत्तीनंतर वयोमानाने विविध आजारांसाठी औषधोपचार साठी खर्च लागतो. वेतन नसल्याने खर्च अधिक आणि पेन्शन कमी अशा अवस्थेत जगणे कठीण होते. म्हणून मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि गाऱ्हाणे ऐकल्यावर त्यांची स्थिती जाणून त्यांच्या रकमा देण्याचा निर्णय घेतला. १४२ कर्मचाऱ्यांना १ कोटी ३७ लाख ७० हजार ८० रुपये वाटप करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
मुख्याधिकारींच्या रास्त आणि कर्मचारी हिताच्या भूमिकेमुळे कर्मचारी संघटनांच्या वतीने उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, लेखाधिकारी चेतन गडकर, प्रसाद शर्मा, सोमचंद संदांनशीव, महेश जोशी, जयेश जोशी, मदन पाटील, प्रमोद लटपटे, ईश्वर पाटील,प्रवीण शेलकर, अशोक बाळू,अकील काझी आदींनी त्यांचा सत्कार केला.