अमळनेर:- भाडेकरूचे घर फोडून मालक व मालकांच्या मुलांनी विना परवानगी घरातील सुमारे ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि घरगुती सामान चोरून नेल्याची घटना १४ जून रोजी कासार गल्लीत घडली.
डॉ राजेंद्र काशिनाथ पिंगळे हे ६५ वर्षांपासून गंगाराम निंबा महाजन यांच्या घरात भाड्याने राहत आहेत. १ जून रोजी ते पत्नीच्या वैद्यकीय तपासणीसाठी मुलांकडे पुणे येथे गेले होते. त्यांच्या वरच्या मजल्यावरील भाडेकरू देखील महिन्याभरापूर्वी गावाला गेले होते. १४ जून रोजी दुपारी १ पासून ते सायंकाळ पर्यंत घराचे पत्रे व साहित्य दिनेश निंबा महाजन,अनिल निंबा महाजन यांनी तोडफोड करत असल्याचा फोन आला. १५ रोजी डॉ पिंगळे अमळनेर आले असता त्यांना घरातील फ्रीज, कुलर , टीव्ही, दवाखान्याचे टेबल खुर्च्या , गॅस हंडी, शेगडी असे घरगुती साहित्य, ३५ हजार किमतीची सोन्याची माळ, ७ हजार रुपयांच्या चलनी नोटा असे एकूण ६२ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याचे उघडकीस आले. अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अनिल महाजन, दिनेश महाजन, गंगाराम महाजन यांच्या विरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.