परक्यांची आम्हाला आवश्यकता नाही- तालुकाध्यक्ष भागवत पाटील
अमळनेर-या मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात जे भरघोस विकास झाला तो फक्त आणि फक्त स्थानिक आमदार तथा मंत्री महोदय अनिल दादा पाटील यांच्या मुळे झाला असून,पै न पै त्यांच्याच प्रयत्नांनी आली आहे, या मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक आमदार तथा मंत्री आणि खासदार सक्षम असून परक्यांची आम्हाला मुळीच आवश्यकता नाही असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भागवत पाटील यांनी म्हटले आहे की मुंबईत नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रामिण रस्त्यांच्या 25 कोटींच्या कामांना मंत्री महोदय अनिल दादांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली असताना एका माजी आमदारांनी फक्त एक पत्र प्रकाशझोतात आणून श्रेय लाटण्याचा आणि लोकांना वेडे बनविण्याचा प्रयत्न केला आहे.खरी परिस्थिती पाहता अधिवेशनात विद्यमान आमदारांना निधी मिळवणे कठीण असते माजींचा तर तेथे प्रश्नच राहत नाही. बजेटमध्ये इतरांना निधी घ्यायचाच झाला तर तो खासदारांना मिळू शकतो मात्र इतर कोणत्याही घटकास निधी मिळण्याचा कुठेही संबंध येत नाही.आणि मतदारसंघाचे सुदैव की अनिल दादा मंत्री पदी असल्यानेच मोठा निधी आणणे शक्य होत आहे.यामुळे कोणी कितीही मूर्ख बनविले तरी येथील जनता आता तरी मूर्ख बनणार नाही.आणि राहिला प्रश्न अनिल दादांच्या पत्राचा आणि पाठपुराव्याचा तर याची संपूर्ण फाईल आणि रेकॉर्ड कार्यालयात उपलब्ध असून केवळ एका पत्राचा हा खेळ मुळीच नाही.आतातरी या लोकांनी जनतेला मूर्ख बनविणे थांबवावे असे आवाहन तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केले आहे.