अमळनेर : पुरावे असतील तर टोकरे कोळीचे जात प्रमाण पत्र थांबवू नका अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना दिल्या.
टोकरे कोळी समाजाचे प्रमाणपत्र देणे पुन्हा बंद झाल्याने चोपडा तालुक्याचे कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर यांनी बिऱ्हाड मोर्चा काढून दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी १६ रोजी सायंकाळी उपोषण स्थळी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी बाविस्कर यांनी टोकरे कोळी समाजाच्या लोकांकडून फी घेतली जाते ,टोकन दिले जाते मात्र प्रमाणपत्रासाठी थांबवले जाते. काहीच निर्णय होत नाही असे सांगितले. उपविभागागीय अधिकारी खेडकर जळगाव येथे बैठकीस गेले असल्याने मंत्री अनिल पाटील यांनी त्यांच्याशी भ्रमाणध्वनीद्वारे संपर्क साधला. जर लोकांकडे टोकरे कोळी समाजाचे पुरावे असतील तर त्यांना ताबडतोब दाखले द्या , दोन दिवसात पुरावे तपासा , दाखले देणे का थांबवण्यात आले ते देणे सुरू करा अशा सूचना दिल्यात. यावेळी एल टी पाटील , शहराध्यक्ष मुख्तार खाटीक , पिंटू सोनार , देविदास देसले , राहुल गोत्राळ हजर होते.