बोदर्डे येथील घटना, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील बोदर्डे येथील ४७ वर्षीय इसमाने खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना २१ रोजी उघडकीस आली आहे.
याबाबत मंजुळाबाई मिस्तरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती संतोष हिरामण मिस्तरी यांनी गावातील अशोक दयाराम चौधरी यांच्याकडून २० हजार व मुडी येथील भालेराव गोविंदा महाजन यांच्याकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. संपूर्ण कुटुंबीय मोलमजुरी करून २० हजाराचे आठवड्याला दोन हजार व १५ हजाराचे महिन्याला तीन हजार असे व्याज देत होते. मात्र दोघे ही घरी येवून व्याजाचे पैसे का देत नाही अस सांगत त्रास देत असत. तसेच त्या दोघांनी वेळोवेळी सुतारकाम करण्याचे साहित्य, बजाज पल्सर कंपनीची दुचाकी, तसेच घरातील वस्तू उचलून नेल्या आहेत. २० जुलै रोजी सायंकाळी अशोक चौधरी व भालेराव महाजन हे दोघे फिर्यादीच्या घरी आले व तू चालू हप्त्याचे व्याज दिले नाही असे म्हणू लागले. यावर फिर्यादीचे पती संतोष मिस्तरी यांनी व्याज देवून ही तुम्ही घरच्या वस्तू, मोटरसायकल, मिस्तरी कामाच्या वस्तू उचलून नेल्या आहेत. त्यावर ते दोघे म्हणाले की, भडव्या आज वस्तू नेल्या, उद्या तुझी बायको देखील उचलून नेवू. तुझ्याकडून जे होईल ते कर असे बोलत उद्या काय करतो ते पहा अशी धमकी देवून गेले. त्यावेळी आजूबाजूचे ही सर्व लोक जमा झाले होते. या वादामुळे संतोष मिस्तरी रात्री उशिरापर्यंत जागे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते रूममध्ये दिसून आले नाहीत म्हणून त्यांची पत्नी मागच्या रूममध्ये गेली असता त्यांनी मागील रूममध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मारवड पोलीसात दोन्ही खाजगी सावकारांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एपीआय शितलकुमार नाईक हे करीत आहेत.