
अमळनेर : गेल्या दीड वर्षापासून गावाची बस बंद केली आणि दुसऱ्या बस मध्ये बसू दिले जात नाही म्हणून तालुक्यातील पळासदळे येथील शालेय विद्यार्थिनींनी बैलगाडी आडवे लावून बस थांबवून आंदोलन केले.
पळासदळे येथील शालेय विद्यार्थिनी अमळनेर येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी येत असतात. पळासदळे गावासाठी स्वतंत्र बस येत होती. मात्र दीड वर्षांपासून पळासदळे बस बंद करण्यात आली. रामेश्वरला येणाऱ्या बस मध्ये विद्यार्थ्यांना बसू दिले जात नाही. प्रवाशी जास्त असल्याने शालेय विद्यार्थ्यांना उतरवून दिले जात होते. १२ वाजेला शाळा असणाऱ्या मुली एक वाजेला शाळेत पोहचायचे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. ग्रामपंचायतीने देखील याबाबत पत्रव्यवहार करून दखल घेतली गेली नाही. म्हणून अखेर संतप्त विद्यार्थिनींनी गावकऱ्यांच्या मदतीने रस्त्यात बैलगाडी आडवे लावून बस रोखली. बराच वेळ बस रोखून धरण्यात आली. अखेर एस टी प्रशासनाने दखल घेण्याचे आश्वासन दिल्यानन्तर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान मानवविकास अंतर्गत आलेल्या बसेस चे नियोजन चुकल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नाही. कोरोनाच्या काळात ९५ बसेस होत्या आता ७१ बसेस आहेत. पळासदळे बस बंद केल्याने रामेश्वर बस मध्ये यावे जावे लागते. महिलांना प्रवास मोफत झाल्याने बस मध्ये गर्दी वाढली. मात्र पळासदळे येथे स्वतंत्र बस सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. लवकर निर्णय घेतला जाईल.- प्रमोद चौधरी , आगार व्यवस्थापक , एस टी आगार अमळनेर

