गैरसमजुतीतून एकमेकांपासून पाच वर्षे लांब गेलेले दोन जोडपे आले एकत्र…
अमळनेर:- नातेवाईकांच्या चुकीच्या सांगण्यामुळे एकमेकांपासून पाच वर्षे लांब गेलेले दोन जोडपे लोकअदालतीमुळे पुन्हा सुखाने नांदायला तयार झाले. शनिवारी झालेल्या लोक अदालतीत १२१२ प्रलंबित खटल्यापैकी १०६ खटले निकाली निघाले. एकूण १ कोटी ८९ लाख ७४ हजार ३५१ रुपयांची वसुली करण्यात आली.
तसेच २३७३ वादपूर्व खटल्यापैकी ३१ खटले निकाली निघाले त्यात ३० लाख ९७ हजार २५० रुपयांची वसुली झाली. मात्र नगरपालिकेच्या ९६ थकबाकीदारांना वाटाघाटी करण्यासाठी लोकअदालतीत बोलावण्यात आले होते. नगरपालिका एक पाऊल देखील मागे सरकायला तयार नव्हती म्हणून तडजोड होऊ शकली नाही. तडजोड करायची नव्हती तर नगरपालिकेने हे खटले लोकअदालतीत ठेवण्यास संमती का दिली असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी यांनी केला आहे. थकबाकीदारांना फक्त न्यायालयाचा धाक दाखवून तडजोडीसाठी बोलावले मात्र पालिकेने तडजोडीची भूमिकाच घेतली नाही.
दरम्यान कौटुंबिक खटल्यात तडजोड करत असताना एका नवऱ्याला आपण नातेवाईकांच्या सांगण्यावरून पत्नीशी वाद घातलेत याचा पश्चाताप झाला त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. तर एका पत्नीने देखील नातेवाईकांनी कान भरल्यामुळे आमच्यात गैरसमज झाले असे कबुल करून तिलाही रडू कोसळले. मात्र लोकअदालतीत तडजोड होऊन दोन्ही दाम्पत्याने सुखाने संसार करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या डोळ्यात आंनदाश्रू आले. यावेळी व्ही. बी. गव्हाने, जिल्हा न्यायाधीश 1, ऍड. व्ही वाय बडगुजर, पी पी देशपांडे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, ऍड. आर. आर. पाटील, एन. आर. येलमाने सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, ऍड. संदीप अशोक डामरे, श्रीमती ए. यु. यादव, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, ऍड. माधुरी ए. ब्रह्मे यांनी कामकाज पाहिले. सदर लोक अदालत मध्ये वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ ऍड विलास डब्लु. वाणी, वकील संघाचे अध्यक्ष ऍड वाय. पी. पाटील, उपाध्यक्ष ऍड नंदलाल व्ही. सूर्यवंशी, सचिव ऍड जितेंद्र पी. साळी व सरकारी वकील किशोर बागुल, शशिकांत पाटील, राजेन्द्र चौधरी तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.