
ते नगरसेवक माझ्यासोबत, पत्रकार परिषद घेत शिरीष चौधरींनी केला खुलासा…
अमळनेर:- सध्या माजी आमदार शिरीष चौधरी हे उभे राहतात की नाही अशी अफवा पसरवून गैरसमज निर्माण केले जात आहे, मात्र मी येत्या विधानसभेत अपक्ष उमेदवारी करणार असल्याचा खुलासा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मा.आ. चौधरी म्हणाले की, अनेक दिवसांपासून राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू असून राजकीय नेते आपली पोळी भाजण्यासाठी अफवा पसरवत होते. अमळनेर मतदार संघ काही नेत्यांच्या बोटावर नाचणारा असे दर्शविले जाते ही मतदार संघात आलेली मग्रुरी थांबली पाहिजे. काही मोठे नेते अपघाताने निवडून आले तो अपघातच होता. त्यांचे कार्यकर्ते अफवा पसरवत आहेत की, शिरीष चौधरी आमदारकी लढवणार नाहीत. संविधानाने आपल्याला अधिकार दिले असून कोणीही एक व्यक्ती ठरवू शकत नाही. मी अपक्ष लढणार आहेच. मेळावा घेतला, पाच वर्षांपासून संपर्कात आहे. आताही माझे कामे सुरू आहेत. लोकांची दिशाभूल करून खोटा अपप्रचार केला जात आहे. शिरीष चौधरी निवडले तर गुंडगिरी वाढेल, दादागिरी वाढेल असा गैरसमज पसरवला जात आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात राग आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी उमेदवारी करणार असून माझे शरद पवार, उपमुख्यमंत्री फडणवीस, नाना पटोले यांच्याशी चांगले संबंध आहेत. हे दोन्ही दोन नेते स्वार्थासाठी एकत्र आले असून जनतेच्या सेवेसाठी नाही. काही लोक राजकीय स्वार्थासाठी आपले रंग बदलतात त्यांना जनता त्यांची जागा दाखवेल. जनतेचा कौल मोठ्या प्रमाणात माझ्याकडे आहे. गेल्यावेळी जातीचे राजकारण करण्यात आले, त्यामुळे पराभव पत्करावा लागला. मात्र अपक्ष उमेदवार करणारच असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नगरसेवक नरेंद्र चौधरी,गोपी कासार, सलीम टोपी हे कुठेच जाणार नाहीत ते शेवटपर्यंत माझ्यासोबत असतील याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या भल्यासाठी जीकडे सत्ता असेल तिकडे मी जाईल असेही त्यांनी सांगितले.
मध्यंतरी आपण अमळनेर पासून दूर गेले होते असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, पराभव झाल्यापासून मी जनतेच्या विकासाची कामे करत असून ३२ गावांचे पैसे, पीक विम्यासाठी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कडे तगादा लावल्याचे त्यांनी सांगितले.