
अमळनेर:- तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे येथे पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या नर हरणाला सामाजिक कार्यकर्त्यांच्या व वन विभागाच्या प्रयत्नांनी जीवदान मिळाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चिमणपुरी पिंपळे शिवारात पुरुषोत्तम लोटन चौधरी यांच्या शेतातील ७५ फूट खोल विहिरीत पाण्याच्या शोधात असलेले नर जातीचे हरिण पडल्याची माहिती पिंपळे येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी पत्रकार डॉ. विलास पाटील यांना दिली. डॉ. विलास पाटील यांनी वनविभागाचे वनपाल पी जे सोनवणे यांना याबाबत कळवल्याने वनविभागाने तत्काळ धाव घेतली. वनपाल सोनवणे यांनी वनमजूर रामदास वेलसे, समाधान पाटील, प्रवीण पाटील, मयूर पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सायंकाळी ५:३० वाजता हरणाला बाहेर काढत प्रथमोपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडले. मार्चच्या मध्यातच उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने वन्यप्राण्यासाठी शिवारात पाणवठ्याची सोय करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.




