
अमळनेर:- तालुक्यातील तालुक्यातील लोण खुर्द येथे अतिवृष्टीने घराची भिंत पडून विधवा वृद्धेच्या घराचे नुकसान झाल्याने महिलेला अश्रू अनावर झाले होते. सततच्या पावसामुळे लोण खुर्द येथील गं.भा.कमलबाई शांताराम पाटील यांच्या मालकीच्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे सदर वृद्ध महिला व कुटुंबीय बेघर झाले आहेत. यंदा पावसाळा सरासरीपेक्षा जास्त होत असल्याने मोठा झटका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबांना बसत आहे. सदर महिला अशिक्षित असल्याने 65 वर्षे वय असूनही वर्षानुवर्ष प्रतीक्षा करुन ग्रामपंचायतीकडून अद्याप घरकुल प्राप्त नाही. तसेच घरात अठरा विश्व दारिद्र्य, शेतीच्या व्यवसायावर पोट भरत नाही, म्हणून दररोज मजुरीला जावे लागते त्यातही कुटुंब सांभाळता सांभाळता मूलभूत गरजा पूर्ण करणे ही शक्य होत नाही अशी बिकट परिस्थिती कमलाबाई यांची आहे. अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीत जाऊन विनंती करून करून अखेर कमलबाई थकली पण घरकुल काही मिळाले नाही, आणि निवाऱ्याचे साधन जे होते तेही निसर्गाने अवकृपेने कोसळले. त्यामुळे कमलबाईला रडण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाच पर्याय उरला नाही. 28 जुलै रोजी भर पावसात रात्री घराची भिंत पडली. त्यानंतर तलाठी पवार यांनी पंचनामा केला आहे. हातावर पोट असणाऱ्या कमलबाई आता पंचनाम्याच्या आणि शासकीय मदतीच्या आशेवर असून त्यांना शासन स्तरावरुन लवकरात लवकर मदत मिळावी, पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी केली आहे.

