अंतूर्ली येथील शेतकऱ्याने तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना दिले निवेदन…
अमळनेर:- तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तात्काळ याबाबत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी आता होत आहे.
तालुक्यातील काही भागात जोरदार वारा व पावसामुळे पिके पडली असून शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अंतुर्ली येथील शेतकरी पवन सुभाष पाटील यांनी नुकसान भरपाई बाबत तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. दि. ७ रोजी रात्री जोरदार वारा, पाऊस व हलक्या स्वरूपाची गार पडल्याने सदर शेतकऱ्याचा मालपुर शिवारात लावलेला गहू जमीनदोस्त झालेला असून नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. विमा कंपनीचा कस्टमर सर्व्हिस ला ही शेतकऱ्याने तक्रार दाखल केली आहे. संपूर्ण तालुक्यात या अवकाळी पावसामुळे काढणीवर आलेला हरभरा, गहू, दादर, सूर्यफूल आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक भागात पिके जमीनदोस्त झाली आहेत. खरीप हंगाम असमतोल पावसामुळे वाया गेल्यानंतर रब्बीवरच शेतकऱ्याची आशा होती. आता मोठे आर्थिक संकट ओढावले गेल्याने लवकरात लवकर पंचनामे करावेत व नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करत आहेत.