
हरभरा,गहू,दादर,सूर्यफूल आदी पिकांचे अतोनात नुकसान…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- पातोंडा व परिसरात सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने शेतातील तयार झालेला माल शेतकऱ्यांच्या घरात येण्याआधीच नेस्तनाबूत करून तोंडावर आलेला घास हिरावून नेल्याने बळीराजा पुन्हा संकटाच्या मोहऱ्यात सापडून हवालदिल झालेला आहे. पातोंडासह नांद्री, खवशी, दहीवद, सावखेडा, मुंगसे,रुंधाटी, मठगव्हाण, नालखेडा,गंगापुरी, खापरखेडा परिसरात शेकडो हेक्टरवर लागवड असलेल्या हरभरा, गहू,ज्वारी,सूर्यफूल पिकांचे अतोनात नुकसान होऊन पिके जमीनदोस्त झालेली आहेत.
कोरोनाच्या महामारीतून कसाबसा सावरत शेतकरी राजा आर्थिक अडचणीचे पांघरून घेऊन पुन्हा एकदा नव्या उमेदीने शेतीकडे वळला. पीककर्जे, सावकारी कर्जे घेऊन खरीप पिकांची पेरणी केली.पावसाच्या सुरवातीला दोन महिने पावसाने पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. तरीही हार न मानता शेतकऱ्यांनी शेती केली.खरीप हंगाम वाया गेल्याने रब्बी हंगामाची आशा बळीराजाला दिसून येत होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली.त्यासोबतच गहू, ज्वारी, सूर्यफूल, डांगर, कांदे,बाजरी आदी पिकेही पेरणी केली होती. कापसाची फरदड व हरभराची काढणी एकाचवेळी आल्याने मजुरांची टंचाई जाणवत होती. शेतकऱ्यांनी बाहेरून मजूर मागवून काही प्रमाणात हरभरा पिकाची काढणी केली.मात्र मजूर व काढणी मशीनच्या अनुपलब्धतेने शेतकऱ्यांच्या शेतात काढणीवर आलेला उभा हरभरा शेतातच पडून आहे.तर काही शेतकऱ्यांचा हरभरा कापून पडून असल्याने सोमवारी रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे हरभऱ्याला कोंब आणून ठेवले आहेत तर गोळा केलेला हरभरा देखील वाऱ्यामुळे उडून गेला आहे. गहू, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल पिके ही खाली पडून भुईसपाट झालेली दिसून येत आहेत.शेतकऱ्यांनी पेरणीपासून आर्थिक खर्चाचा पहाड उचलत बियाणे,रासायनिक खते,फवारणी, मजुरीचा आर्थिक फटका सहन केलेला होता. आता थोड्या दिवसांत पिके काढणीवर आलेली असताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर येणाऱ्या उत्पन्नाचे समाधान दिसून येत होते.पण अचानक धडकलेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामासह रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना फटका देत पुन्हा आर्थिक संकटासमोर शेतकऱ्यांना उभे नेऊन ठेपले आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तात्काळ विनाविलंब नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
नुसते पंचनामे नको तात्काळ भरपाई द्या….
खरीप हंगामात देखील शेतकऱ्यांच्या पिकांना पावसाने मोठा फटका दिला होता. आता रब्बीतही तीच परिस्थिती उद्भवलेली आहे. महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे करण्यास दिरंगाई तर होतच असते परिणामी नुकसानभरपाई मिळण्यासाठी देखील शेतकऱ्यांना प्रचंड वाट पाहावी लागते. आधीच शेतीसाठी हातातला सगळा पैसा खर्च शेतीवर खर्च करून शेतकरी उदार होऊन बसतो.त्यात ऐनवेळी अवकाळी पाऊस पडून पिकांचे नुकसान होते.परिणामी सर्व आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित असते पण ती वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कुचुंबना होते.म्हणून आतातरी शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा व परिस्थितीचा विचार करून झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ देण्याची मागणी केली आहे.
वीटभट्टी मालकांना देखील अवकाळी पावसाचा फटका…
पातोंडासह दापोरी, सावखेडा, नांदेड व निमगव्हाण परिसरात शेकडो प्रमाणात वीटभट्टीचा व्यवसाय सुरू आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने वीटभट्टी वरील कच्चा मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने वीटभट्टी मालकांना लाखो रुपयांचा मालाची हानी झालेली आहे. पावसामुळे माती व इतर लागणारा कच्चा माल वाहून गेला असून कच्चा विटांचा गारा झालेला आहे.त्यामुळे वीटभट्टी व्यवसायिकांनादेखील अवकाळी पावसाने आर्थिक फटका दिल्याने त्यांच्यावर देखील आर्थिक संकट ओढावले आहेत.







