
डांगर बु.ग्रामस्थांचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवारांना निवेदन
अमळनेर– तालुक्यातील पांझरा- माळण नदी जोड प्रकल्पास मान्यता द्यावी या मागणीचे निवेदन डांगर बु.ग्रामस्थांच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना देण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार अमळनेर येथे जनसंवाद यात्रेनिमित्त आले असता ग्रामस्थांनी त्यांचे गावाजवळ स्वागत करीत लोकनियुक्त सरपंच प्रकाश रंगराव वाघ व समाजसेवक राजेश वाघ यांच्या नेतृत्वात नदी जोड प्रकल्पासंदर्भात निवेदन देण्यात आले.यात म्हटले आहे की अमळनेर तालुक्यातील पश्चिम भाग हा कायम अवर्षण प्रवण क्षेत्रात आहे ,या क्षेत्रातील गावात उन्हाळ्यात कायम पिण्यासाठी शासन ट्रँकरद्वारे पाणी पुरवीत असते. या परिसरातील डांगर बु. या गावात पाण्याची कायम टंचाई असते,प्रत्यक्षात येथूनच माळण नदीचा देखील उगम असुन ही नदी पुढे बोरी नदीला जाऊन मिळते, साधारण वीस ते बावीस गाव माळण नदी काठी वसली आहेत, डांगर बु. पासून साधारण आठ कि. मी. वर पांझरा नदी वाहत असून पांझरेचे पाणी डांगर येथील पाझर तलावात टाकल्यास माळण नदी निश्चितपणे प्रवाहीत होऊ शकते त्याचा फायदा पश्चिम भागातील साधारण ५० ते ६० गावांना होऊन पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची देखील समस्या सुटू शकते. पाडळसरे धरण जरी पूर्ण झाले तरीही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या भागाचा समावेश नसल्यानें त्याचा फायदा या भागाला होणार नाही यामुळे या क्षेत्रातील गावांचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी पांझरा माळण जोड प्रकल्पाचा विचार व्हावा अशी विनंती यात करण्यात आली आहे.निवेदनावर प्रकाश वाघ,राजेश वाघ यासह असंख्य ग्रामस्थ व शेतकरी बांधवाच्या सह्या आहेत.सदर निवेदन मंत्री अनिल पाटील यांनाही देण्यात आले आहे.