तात्काळ आग विझवल्याने टळले मोठे नुकसान…
अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे येथील बँक ऑफ बडोदा शाखेला १४ रोजी पहाटे दोन वाजता आग लागल्याची घटना घडली असून यात इन्व्हर्टर व बॅटरीचे नुकसान झाले. मात्र तात्काळ आग आटोक्यात आल्याने मोठे नुकसान टळले आहे.
दिनांक १४ रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास बँकेतून धूर निघत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ बँकेच्या शाखाधिकारी यांना कळविल्याने शाखाधिकारी भिसे यांनी अग्निशमन दल व इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेत त्याठिकाणी धाव घेतली. बँकेच्या पुढील भागात धूर निघत असल्याने ग्रामस्थांच्या मदतीने मागील दरवाजा तोडत आत प्रवेश केल्यावर स्वतंत्र कक्षात असलेले इन्व्हर्टर व बॅटरी जळताना दिसली. अग्निशमन दलाने ही आग विझविली. यात इव्हर्टर, युपीएस व १२ बॅटरी जळून खाक झाली आहेत. मात्र कागदपत्रांच्या कक्षापर्यंत आग न पोहचल्याने कागद व रोख रोकड सुरक्षित राहिली आहेत. याप्रकरणी मारवड पोलिसांत आगीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ. भरत श्रीराम इशी हे करीत आहेत. सदर आग विझवण्याकामी अग्निशमन प्रमुख दिनेश बिऱ्हाडे, ड्रायव्हर भिकन पठाण,जाफर पठाण फायरमन आनंदा झिम्बल, पोलीस पाटील रामचंद्र चौधरी यांच्यासह गावातील पंडीत पाटील, अभिषेक जैन,भरत पाटील व गावातील इतर ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले.