मारवड पोलिसांनी केला १३.६० लाखांचा मुद्देमाल जप्त
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे पांझरा नदीतून वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर मारवड पोलिसांनी मध्यरात्री पकडत १३.६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जिभाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार सफौ फिरोज बागवान, हेकॉ संजय पाटील, सचिन निकम, सुनील अगोने, पोकॉ प्रवीण पाटील आदींचे पथक दिनांक १६ रोजी पहाटे ००:३० रोजी मांडळ येथे सोनगीर रस्त्याकडे जाणाऱ्या नवीन पुलाजवळ थांबले असता त्यांना पांझरा नदी पात्रातून तीन ट्रॅक्टर बाहेर निघताना दिसल्याने त्यांना अडवले. त्यात सोनालिका कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर, निळ्या रंगाचे न्यू हॉलंड कंपनीचे ट्रॅक्टर व निळ्या रंगाच्या स्वराज कंपनीचे अश्या तीन ट्रॅक्टरमध्ये वाळू भरल्याचे दिसून आले. यावेळी चालकांना नाव गाव विचारले असता सोनालिका ट्रॅक्टरचे चालक गणेश शांताराम कोळी (रा. मांडळ) व मालक पंकज सुकदेव कोळी असून न्यू हॉलंड कंपनीच्या ट्रॅक्टरवरील चालकाचे नाव समाधान भास्कर पाटील (रा. मांडळ), व स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरवर चालक सागर नाना कोळी व मालकाचे नाव अजय ईश्वर कोळी (रा. मांडळ) हे असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी वरील तिन्ही ट्रॅक्टर व एकूण ४ ब्रास वाळू असा १३,६०,५०० रुपयांचा मुद्देमाल मारवड पोलिसांनी जमा केला असून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ भरत श्रीराम इशि हे करीत आहेत.