अमळनेर:- तालुक्यातील गांधली येथे नियमित कर भरणा करणाऱ्या दोन ग्रामस्थांना स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकावण्याचा मान देण्यात आला.
गांधली ग्रामपंचायतीने अनोखा उपक्रम राबवत पाणीपट्टी व घरपट्टीचा नियमितपणे कर भरणा करणाऱ्या (नियमित करदाते) ग्रामस्थांपैकी दोन ग्रामस्थांची निवड १५ ऑगस्टच्या ध्वजवंदनासाठी करण्यात आली होती. त्यासाठी अंगणवाडी येथील ध्वजवंदन श्रीमती उषाबाई विश्वास पाटील यांच्या हस्ते व ग्रामपंचायत कार्यालयावरील ध्वजवंदन श्रीमती लक्ष्माबाई अभिमान पारधी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी वाजत गाजत प्रभातफेरी काढून राष्ट्रगीत व देशभक्तिपर गीत सादर केले.