अशपाक पिंजारी, मिलन शहा यांच्या जोडीला सलाम…
अमळनेर:- येथील अशपाक मुनिर पिंजारी व मिलन नविनचंद्र शहा या दोघांसह नागपूरचे अजिंक्य रवींद्र कुट्टेवार , आणि आर्थिक भागीदार भरतकुमार त्रिभुवनदास पटेल (रा अंकलेश्वर, गुजरात) या सर्वांनी हळद उत्पादनाच्या विविध घटकांचे एक दोन नव्हे तर तब्बल १० पेटंट आणि बायोमास व सीएनजी गॅस संदर्भात वरील सर्वांनी शास्त्रज्ञ हर्षल सुरेशराव गटकीने रा नागपूर यांच्या सोबत तीन पेटंट असे एकूण १३ पेटंट ६ ऑगस्ट २०२४ रोजी जर्मनीहून घेतले आहेत. एकाच दिवशी इतके पेटंट मिळवणारी एम एम आई कंपनी व ग्रुप पहिलाच असून ते देखील त्यांचे जागतिक रेकॉर्ड झाले आहे. ग्रीनिज बुक ऑ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद होणार आहे.
अशपाक आणि मिलन ही जोडी १८ वर्षापासून हळदीची शेती करीत आहेत. सर्वसाधारणपणे हळदीचे उत्पन्न ९ महिण्यात येत असे मात्र त्यांनी नवीन तंत्रज्ञान शोधून काढले असून ही हळद २० महिन्यात उत्पन्न देणारी परंतु आधीपेक्षा पाच पटीने उत्पन्न देणारी आहे. या नवीन उत्पन्नात अधिक औषधी गुणधर्म आणि दुपटीने ऑइल निघते. आधी हळदीपासून काही घटक घ्यायचे असतील तर हळद उकळवून मोठी व किचकट प्रक्रिया करून कोरडी करावी लागत होती. त्यात अधिक खर्च आणि वेळ जात होता. आता नवीन तंत्रज्ञानाने ओल्या हळदीतून कर्क्युमीन ,हळद अर्क, हळदीचे तेल, हळदीचे ज्यूस, हळदीचे अन्न घटक ,द्रवरूप हळद , हळदीचे स्लाईस तयार केले जातात. आधीच्या पद्धतीत हळद उकळले व कोरडी केली जात असल्याने पोषक घटक निघून जायचे. नव्या तंत्रज्ञानाने १२ ते १५ टक्के कर्क्युमीन असलेली हळद पावडर तयार केली जाते जे प्रमाण पूर्वी २ ते ७ टक्के होते. आरोग्यवर्धक व प्रतिकारशक्ती वर्धक हळदीचा काढा, ज्यूस ज्यात काळी हळद ,आंबे हळद आदी घटक मिसळले जाणार आहेत. हळदीचे तेल जे त्वचा रोग साठी उपयुक्त ठरणार आहे. हळदीची फूड पेस्ट ,टूथ पेस्ट असे विविध उत्पादने विदेशात उपयुक्त येणारे घटक निर्माण करण्यात येणार आहेत. यासह हर्षल गटकीने या शास्त्रज्ञाच्या मदतीने बायोमास पासून कमी खर्चात सीएनजी चे जास्त उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. असे तीन पेटंट मिळवले आहेत. या सर्व प्रकल्पात भरतकुमार पटेल यांचे त्यांना आर्थिक सहकार्य लाभले आहे.
अमळनेरच्या या जोडीचे यश निश्चित अमळनेरच्या नावलौकिकात भर टाकणारे आहे. उद्योग, साहित्य ,क्रांती , धार्मिक क्षेत्रात शिखरावर असलेल्या अमळनेरच्या दोघांचे शेतीउद्योग क्षेत्रात जगात नाव जाणार आहे.