अमळनेर (प्रतिनिधी):- महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असून महिला असुरक्षित असल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे.महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबवून दोषींना कडक कारवाई करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे केली.शहरातील महाराणा प्रताप चौकात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तोंडाला काळ्या फिती लाऊन मुक आंदोलन करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,बदलापूर येथील घटनेमुळे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राज्यातील सर्वसामान्य महिला ,मुली यांच्यामधे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.सत्ताधारी पक्षांकडून सत्तेचा गैरवापर करण्यात येत असून पोलिसांवर राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून सर्वसामान्य नागरिकांना गुन्हा दाखल करण्यासाठी १३ तास पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आले असून ही घटना अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटले आहे.
येणाऱ्या काळात सरकारने अशा घटना रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत अन्यथा महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तीव्र आंदोलन छेडतील व होणाऱ्या प्रकारास महायुती सरकार जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील,शहराध्यक्ष शाम पाटील,काँग्रेस चे डॉ.अनिल शिंदे,माजी जि.प.सदस्य के. डी.पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ,संदीप घोरपडे,गोकुळ बोरसे,तालुकाध्यक्ष बी.के.सूर्यवंशी,शहराध्यक्ष मनोज पाटील,प्रशांत निकम,तुषार संदानशिव,गजेंद्र साळुंखे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.