अमळनेर: सात्री ग्रामस्थांचा जुन्या सर्वेक्षणानुसार भूखंड वाटप करण्यास तयार आहे असा ग्रामसभेचा ठराव सादर करावा असे पत्र उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन ) गजेंद्र पाटोळे यांनी निम्न तापी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना २१ रोजी दिले आहे.
अमळनेर तालुक्यातील सात्री गाव हे निम्न तापी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात असून पुनर्वसन रखडले आहे. त्यामुळे या गावाला विकासाचा निधी येत नाही. जुन्या गावातली घरे पडत आहेत आणि शासनाने २०२२ मध्ये भूखंड वाटप थाम्बवले होते. शासन आणखी किती घरे पडण्याची वाट पाहत आहे. दुसरीकडे जुन्या गावातून तालुक्यावर येण्यासाठी रस्ता नाही. पुरातून जीव धोक्यात घालून जावे लागते. अशा समस्यांना सात्रीकर सामोरे जात असल्याने ग्रामस्थांनी तात्काळ भूखंड वाटप आणि नव्या जागेवर स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. पडलेल्या घरांचा पंचनामा करून मोबदला मिळावा अशीही मागणी गावकऱ्यांनी केली आहे. राजेंद्र भावराव पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. यादरम्यान आमदार अनिल भाईदास पाटील , लोकसंघर्ष नेत्या प्रतिभा शिंदे , व गावकऱ्यांनी वाढीव भूखंड वाटपाचा निर्णय शासन स्तरावर घेतल्याशिवाय भूखंड वाटप करू नये असे निवेदन दिले होते. त्यासंदर्भात २०१४ च्या सर्वेक्षणानुसार भूखंड वाटप करण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून सात्री गावाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

