अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयास नुकतीच बेंगलोर येथील नॅक मूल्यांकन समितीने दि. 21 व 22 आॅगष्ट रोजी भेट दिली होती. याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन, महाविद्यालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. या नॅक पुनर्मूल्यांकन समिती मध्ये समिती अध्यक्ष म्हणून प्रा. डाॅ. विभास चंद्र झा माजी कुलगुरू, भारती विद्यापीठ, प. बंगाल, समिती कोऑर्डिनेटर म्हणून प्रा. डाॅ. विश्वंभर प्रसाद साती भुगोल विभाग प्रमुख, ऐझवाल, मिझोरम तर समिती सदस्य म्हणून प्रा. डॉ. जोसेफ दुराई, प्राचार्य, चेन्नई, तामिळनाडू यांच्या सहभाग होता.
सदर समितीने महाविद्यालयाची सविस्तर माहिती घेऊन ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले आहे. तसेच महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक पीएच.डी. पदवी प्राप्त असल्याबद्दल व महानगरात उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सोयी व ज्ञान व्यवस्था ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्याबद्दल महाविद्यालयाचे सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. वसंत देसले व प्राध्यापकांचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांची व्यवस्थितपणे सोडवणूक केल्याबद्दल शिक्षकेतर कर्मचारी व कार्यालयीन स्टाफचे सुद्धा अभिनंदन केले आहे.
सदर समितीने आपल्या भेटीचा सविस्तर पुन मूल्यांकन अहवाल नॅक समिती बेंगलोरला पाठवल्यानंतर नॅक कार्यालयाकडून महाविद्यालयास “सी” श्रेणी प्राप्त झाली आहे.
त्याबद्दल सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परिसरातील मान्यवर, नागरिक व पालकांकडून अभिनंदन केले जात आहे.