अमळनेरच्या कलाकारांनीच साकारला भव्य गड
अमळनेर-येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हिमाचल प्रदेश मधील ज्वालादेवीचा देखावा सकारण्यात आल्याने हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळत आहे,विशेष म्हणजे अमळनेरच्या कलाकारांनीच या भव्य गडाचा देखावा साकारला असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हिमाचल प्रदेशातील डोंगरांमध्ये प्रसिद्ध ज्वाला देवी मंदिर लपले असून हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील कालीधर टेकडीवर देवीला समर्पित हे मंदिर आहे. जातीच्या मातेचे मंदिर म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देवी सतीची जीभ पडली होती अशी मान्यता आहे.हा देखावा बाजार समिती गणेश मंडळाच्या सदस्यांनी साकारण्याचा निर्णय घेऊन याची जबाबदारी अमळनेर येथील प्रसिद्ध कलाकार प्रकाश बोरसे व संजय बोरसे यांच्या वर सोपविण्यात आली त्यांनी आकाश बोरसे,रोहित पाटील,गणेश बोरसे यासह एकूण दहा लोकांची टीम उभी करून 15 ते 20 दिवसात हा देखावा साकारला आहे.विशेष म्हणजे अवघ्या सहा लाखाच्या बजेटमध्ये देखावा साकारला गेला असून यासाठी गोणपाट, सिमेंट, सेन्ट्रीग आदींचा वापर करण्यात आला आहे. आतमध्ये एक गणपती बाप्पांचा आणि दुसरा ज्वाला देवीचा असे दोन गाभारे असुन भाविकांना उकाडा होऊ नये यासाठी ठिकठिकाणी कुलर पंखे लावण्यात आले आहेत.गर्दी होत असली तरी भाविकांना शिस्तीने रांगेत देखावा दाखविला जात असून गर्दीमुळे मार्केट परिसरास यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मंडळासाठी अध्यक्ष सुधाकर पाटील व सदस्य परिश्रम घेत आहेत.