अमळनेर:- शेती उताऱ्यावर सामूहिक नाव असेल , मिळणारे अनुदान ५० हजारापेक्षा कमी असेल आणि वाद नसतील तर प्रतिज्ञापत्र बॉण्ड पेपरवर न घेता साधे लिहून घ्या आणि शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा अशा सूचना उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
शासनाकडून कापूस आणि सोयाबीन अनुदान हेक्टरी ५ हजार रुपये जाहीर केले आहे. मात्र उताऱ्यावर सामूहिक नावे असलेल्या शेतकऱ्यांना सुरुवातीला साधे प्रमाणपत्र मागवण्यात आले. त्यावेळी सातबारा उतारा , बँक पासबुक , आधार कार्ड आदी कागदपत्रे गोळा करण्यात आले. त्यांनतर प्रशासनाकडून पुन्हा १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र आणि पुन्हा सर्व कागदपत्रे नवीन मागवण्यात आले. सध्या लाडकी बहीण योजना सुरु असल्याने होणारी गर्दी पाहता सर्वांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. १०० रुपयांचे प्रतिज्ञापत्र ११० रुपयाला मिळते ते लिहायला १०० रुपये घेतले जातात. त्याची रजिस्टर नोंदणी करण्यासाठी ५० ते १०० रुपये , सातबारा उतारा काढायला ५० ते ७० रुपये , झेरॉक्स चे पाच रुपये प्रत ,काही दलाल १०० रुपये घेऊन जातात. यामुळे शेतकरी पूर्णपणे लुटला जात आहे. आणि दुसऱ्यांदा बोलावले जात असल्याने त्यांचा वेळ वाया जातो. शेतीकामाचे नुकसान होत आहे. कमी अनुदानासाठी इतका खर्च आणि त्रास सहन करावा लागतो याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.त्यावर उपविभागीय अधिकारी खेडकर यांनी ज्या कुटुंबात वाद आहेत तेथेच फक्त बॉण्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र घ्यावे अशा सूचना देऊन शेतकऱ्यांना न्याय दिला आहे.
शासकीय अनुदान गुंठ्याला ५० रुपये प्रमाणे आहे. मी आणि माझी आई सामायिक वारसदार आहोत आम्हाला फक्त १५०० रुपये अनुदान मिळणार होते मात्र दोनदा प्रतिज्ञापत्र ,कागदपत्रे , आणि कामावरून सुटी घ्यावी लागल्याने दोन ते अडीच हजार रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन सेतूचालकांकडून व विविध विभागाकडून होणारी लूट थांबवावी.- अमोल पाटील ,जानवे ता अमळनेर
यापूर्वीचे अनुदान फक्त आधारकार्ड आणि बँक पासबुकवर टाकले गेले. मात्र आता नव्याने सूचना प्राप्त झाल्याने प्रत्येक शेतकऱ्याचा लिंकिंग मोबाईल नंबर आवश्यक केल्याने पुन्हा नंबर मागवण्यात येत आहेत.- रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार ,अमळनेर