तापीवर पाडळसरे येथे 841 कोटींचा प्रकल्प,थेट शेतांपर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी पोहचणार
अमळनेर-तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रीयेला सुरूवात झाली असून यामाध्यमातून तापीवर पाडळसरे येथे 841.74 कोटींचा उपसा सिंचन प्रकल्प उभारला जाणार आहे,ज्यापद्धतीने घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळते त्याचपद्धतीने थेट प्रत्येकाच्या शेतांपर्यंत पाईपलाईनद्वारे शेतांपर्यंत पाणी पोहोचविण्याची संजीवनी योजना ही संजीवनी योजना असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
हा प्रकल्प मार्गी लावून मंत्री अनिल पाटील यांनी खरोखरच शब्दपूर्ती केली असून याचा लाभ अमळनेरच नव्हे तर पारोळा, धरणगाव व चोपडा तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीला होणार आहे.दरम्यान निम्न तापी प्रकल्प, पाडळसे या बांधकामाधीन प्रकल्पास मंत्री अनिल पाटील यांच्याच प्रयत्नाने रू.४८९०,७७ कोटी किंमतीस महाराष्ट्र शासनाची चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.या सुधारीत मान्यतेद्वारे प्रकल्पांतर्गत प्रथमतःच मंत्री अनिल पाटील यांच्या आग्रहाने शासकीय उपसा सिंचन योजनांचा समावेश करण्यात आला आहे. निम्न तापी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामांत एकूण २५,६५७ हेक्टर शेत जमीनीस सिंचनासाठी पाईपलाईन द्वारा पाणी देण्याचे नियोजन आहे. या शासकीय उपसा सिंचना योजनामुळे अमळनेर तालुक्यात १९९८७ हेक्टर, चोपडा तालुक्यातील २५६१ हेक्टर आणि धरणगांव तालुक्यातील ३८१ हेक्टर व पारोळा तालुक्यातील २७२८ हेक्टर जमीनीस सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
या शासकीय उपसा सिंचन योजनांची निविदा सुचना तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव यांचेद्वारा नुकतीच प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या कामाची निविदा किंमत रू. ८४१.७४ कोटी इतकी आहे.
तसेच राज्य शासनाने मागणी केल्यानुसार, निम्न तापी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा समावेश भारत सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY) या योजनेत होण्याची प्रक्रीया अंतीम टप्यात आहे. जे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून शेतक-यांना सिंचन सुविधा द्यावयाच्या पात्रतेचे असतात, त्या प्रकल्पांना भारत सरकारच्या PMKSY या योजनेतून निधी उपलब्ध होतो. निम्न तापी प्रकल्पाच्या टप्पा १ मधील बहुतांश लाभक्षेत्र अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्यामुळेदेखील हा प्रकल्प भारत सरकारच्या PMKSY या योजनेत समावेश होणेस पात्र ठरतो. मात्र केंद्र सरकार, राज्याद्वारा प्रस्तावीत प्रकल्पाचे किती काम झाले आहे. तसेच उर्वरीत कामे पूर्ण होण्यात किती अवधी लागेल याचा आढावा घेते. तसेच उर्वरीत कामापैकी किती कामांच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत, याचा देखील आढावा केंद्राद्वारे घेतला जातो. त्यामुळे प्रकल्प नियोजनानुसार पुर्ण करून लाभक्षेत्रास सिंचन सुविधा पुरविण्याच्या दुष्टीने उपसा सिंचन योजनांची निविदा कार्यवाही शासनाद्वारे प्राधान्याने सुरू करणेत आली असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.
सदर प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना अजित पवार,ग्रामविकासमंत्री ना गिरीश महाजन,जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील व खा.स्मिताताई वाघ यांचे आभार व्यक्त केले आहेत.
स्वप्न खरे ठरवल्याचा आनंद
ज्या दिवसांपासून शेती समजायला लागली तेव्हापासूनच आपल्या भागातील शेतकरी बांधवाना थेट नदीवरून पाईपलाईन द्वारे पाणी मिळाले पाहिजे असे स्वप्न मी पाहिले होते,जनतेच्या आशीर्वादाने आमदार झालो आणि हे स्वप्न साक्षात उतरवण्याची संधी मिळाली,यासाठी अथक प्रयत्न केले,प्रत्यक्षात अनेक अडचणी देखील आल्या परंतु विद्यमान राज्य शासन शेतकरी बांधवांप्रती संवेदनशील असल्याने अतिशय मोठ्या खर्चाच्या या प्रकल्पाला मोठ्या मनाने मंजुरी दिली आहे.आता प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया देखील सुरू झाल्याने लवकरच येणाऱ्या काही दिवसात माझ्या भागातील शेतकरी बांधवाना शेतांपर्यंत पाणी मिळेल,यामुळे तो खऱ्या अर्थाने सुखी आणि समृद्ध होईल.यामुळे संबंधित तालुक्यातील जिरायत हा शब्द कायमचा निघून बागायत हा सन्मानाचा दर्जा मिळेल.त्यामुळे या भूमीचा भूमिपुत्र म्हणून माझी स्वप्नपूर्ती होत असल्याचा प्रचंड आनंद मला आज मला होत आहे.
अनिल भाईदास पाटील
कॅबिनेट मंत्री-महाराष्ट्र शासन