
ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. आशिष जाधवर यांचे प्रतिपादन…
अमळनेर:- जेव्हा या देशाला वेदांची गरज होती तेव्हा ते महर्षी व्यास यांनी लिहिले,जेव्हा या देशाला रामायणाची गरज होती तेव्हा ते वाल्मिकी यांनी लिहिले तर जेव्हा या देशाला संविधानाची गरज होती तेव्हा ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रज्ञा, करुणा व शील यांचा संगम असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. आशिष जाधवर (संभाजीनगर) यांनी केले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठी वाड:मय मंडळ व आप्पासाहेब र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्यातर्फे आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना भारतीय संविधान आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून जळगाव दूध संघाचे संचालक ॲड.श्रावण ब्रम्हे,खेडी (ता.अमळनेर) येथील माजी उपसरपंच विलास शिंदे,प्रताप महाविद्यालयाचे प्रा.विजय तुंटे हे होते.सूत्रसंचालन मंडळाचे नरेंद्र निकुंभ तर आभार प्रा.शीला पाटील यांनी मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून भारतीय संविधानाने अस्पृश्यता घालवण्याचे महत्वाचे काम केले.आज प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार संविधानाने दिलेला असून प्रत्येकाच्या मताच मूल्य समान आहे. यातून समानतेच तत्व आपल्याला संविधानाने दिले असल्याचे ॲड. जाधवर यांनी सांगितले.
संविधानात लिहिलेले ३७० कलम हे फाळणीच्या काळात असलेली काश्मीर ची भयानक परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत राहील असे ठरविण्यात आले,मात्र ते कलम काढायला भारताला ७५ वर्षापेक्षा जास्त काळ लागला असल्याचे त्यांनी सांगितले.

