अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र. अमळनेर येथे भांडणात एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी मारवड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी राहुल पाटील रा. मुडी प्र. अमळनेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे काका शिवाजी सुका पाटील याचे मूलबाळ उदरनिर्वाहासाठी बाहेर स्थायिक झाल्याने ते गावात एकटे राहत असतात. दि. १८ मार्च रोजी सकाळी ७:३० वाजता शिवाजी सुका पाटील व त्याचे भाऊ देविदास सुका पाटील, त्याचा मुलगा नितीन देविदास पाटील यांच्यात भांडण सुरू होते. त्यात शिवाजी पाटील यास तो दोघे बापलेक मारहाण करीत असताना नितीन याने लोखंडी पावडी उलटी करून शिवाजी पाटील यांच्या डोक्यात मारल्याने ते बेशुद्ध झाले. बेशुद्ध झाल्यावरही त्यांना लाकडी काठीने मारहाण सुरू होती. फिर्यादी चे वडील भांडण सोडवण्याकरीता गेले असतां त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर गावातील लोकांनी मिळून दोघांची सोडवणूक केली. त्यानंतर ही देविदास पाटील व नितीन पाटील यांनी धमकी दिली की, जो शिवाजी पाटील यांना उपचारासाठी घेवून जाईल त्याला गावात राहू देणार नाही व जिवंत सोडणार नाही. त्यानंतर फिर्यादी याने शिवाजी पाटील यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मारवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पो ना. सुनील अगोने करीत आहेत.