अमळनेर:- मारवड महाविद्यालयात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानिमित्ताने ‘आनंदोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मारवड महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे आयोजित मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानिमित्ताने ‘आनंदोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्राम विकास मंडळ मारवडचे अध्यक्ष जयवंतराव पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत देसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत देसले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून किसान महाविद्यालय पारोळा येथील प्रा डॉ शशिकांत पाटील हे लाभले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सरस्वती प्रतीमा पूजन करून अभिजात मराठी भाषा समितीने केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी मारवड महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ संजय पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून अभिजात मराठी भाषा समितीचे कार्य, संशोधन तसेच अभिजात मराठी भाषेसंदर्भातील निकष, ऐतिहासिक पुरावे, संविधानिक तरतुदी, अभिजात भाषेची पार्श्वभूमी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा व विचारवंतांचा परिचय देत, मराठी भाषा व महाराष्ट्रातले राजकारण यांवर प्रकाश टाकला. तसेच अभिजात भाषेत मराठी भाषेचा सातवा क्रमांक आहे. तसेच प्रस्तुत निर्णयाचे स्पर्धा परीक्षार्थींसाठीचे महत्त्व यांवर जोर दिला. यावेळी त्यांनी मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जा प्राप्ती संदर्भातील फायदे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले म्हणाले की, ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला, ही मराठी भाषिकांच्या दृष्टीने अतिशय गौरवाची बाब आहे. अभिजात दर्जा प्राप्त झाल्यामुळे मराठीच्या संशोधनावर भर दिला जाईल. मराठीच्या संशोधनासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनुदान प्राप्तीस वाव मिळेल. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर मराठी भाषिकांनीही आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी हातभार लावणे गरजेचे आहे’. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. सतिश पारधी यांनी केले तर आभार प्रा डॉ दिलीप कदम यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील आय क्यू सीचे प्रमुख प्रा डॉ माधव वाघमारे उपस्थित होते तसेच बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.