अमळनेर : तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, पीक विम्याची रक्कम तात्काळ द्यावी , शेतकऱ्यांना कृषी कर्ज माफी द्यावी आदी विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनीज उत्स्फूर्तपणे तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात जाणारा रस्ता बराच वेळ अडवून धरला होता.
अमळनेर तालुक्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सतत पाउस झाला आहे. तसेच १४ ऑक्टोबर पर्यंत अवकाळी पाऊस पडला आहे. एकूण १३५ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मका पीक शेतात सडले आहे. तर कापूस पिकाच्या कैऱ्या ,फुले झडू लागली आहेत त्यामुळे १०० टक्के पीक विमा मिळावा , शासकिय मदत तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात यावी या मागणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी दिलीप पाटील व शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन दिले. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवेदनावर दिलीप पाटील ,शिवाजी पाटील, मधुकर पाटील,कैलास पाटील, हेमराज पाटील, बन्सीलाल पाटील, विजय पाटील,दयाराम साळुंखे, नारायण चव्हाण, आनंदा पाटील, बाबुराव पाटील,लक्ष्मण पारधी, हेमलाल पाटील,मनोज पाटील, राजेंद्र मुंदडे, भटू पाटील, यशवंत बाविस्कर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.