अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे ४ नोव्हेंबर सु. ही. मुंदडे हायस्कूल येथे २० वर्षांपासून ते चक्क ९० वर्षे वयापर्यंतच्या सर्व विवाहित माहेरवाशीणींचा स्नेहमिलन सोहळा आयोजित केला आहे.त्यात इतर गावांहून मारवड येथे शिक्षणासाठी येणाऱ्या सर्व माहेरवाशीण भगिनींचा समावेश असणार आहे.
तालुक्यातील मारवड येथे माय माहेरच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्वच माहेरवाशिणींना एकत्र बोलावुन मारवड येथिल माहेरवाशिण तसेच मारवडला शिकण्यासाठी आलेल्या सर्व सखींना एकत्र भेटण्याचा आनंददायी योग दि.4 नोव्हेंबर सोमवार रोजी’ वाट माहेरची ‘ या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहे. गावातील सर्वच वयोगटाच्या माहेरवाशीण महिलांसाठी हा कार्यक्रम ज्ञानदेव -मुक्ताई ग्रुप मारवड यांच्यातर्फे आयोजित केला आहे. कार्यक्रमातील रॅलीत विविध कर्तबगार महिलांच्या वेशभूषा साकारल्या जाणार आहेत.सु. हि. मुंदडे हायस्कुलच्या प्रांगणात सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कथाकथन, नृत्य, कलागुणदर्शन, व लकी ड्रॉ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने माय माहेरच्या आठवणी व बालपणीच्या सर्व मैत्रिणींना भेटण्याचा दुग्धशर्करा योग येणार असल्याने माहेरवाशिणींकडून कार्यक्रमास भरगच्च प्रतिसाद मिळत आहे.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्ञानदेव मुक्ताई, ग्रुप मारवड यांच्यातर्फे नियोजन केले आहे.