
प्रहार अपंग क्रांती संघटनेचे योगेश पवार यांची आग्रही मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील दहिवद येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी संजीव साहेबराव सैदाणे यांनी ग्रामपंचायत मधील शासकीय सेवेत असलेल्या २ व्यक्तींना दिव्यांग ५% निधीतून मालमत्ता करात १०,५५०/- रुपये तर दुसऱ्या व्यक्तीस १४१८/- रुपये सूट दिली आहे. प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी हा गंभीर प्रकार शासनाच्या निदर्शनास आणून दिला असून या बाबत अमळनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हिरालाल वाघ यांनी अर्जानुसार ग्रा.पं जाऊन चौकशी केली असता तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी लाभ दिल्याचे सिद्ध झाले असल्याने गटविकास अधिकारी श्री.एकनाथ चौधरी यांनी अनियमितता केल्याने प्रशासकीय कारवाईस पात्र असल्याचा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगाव यांना सादर केला आहे. मात्र काही अधिकारी कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी या ग्रामविकास अधिकारी कडून भविष्यात असे प्रकार पुन्हा होणार असल्याची शक्यता नाकारता येत नसून मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन जि. प कडून निश्चितच कारवाई करू असे आश्वासन डॉ.पंकज आशिया यांनी दिले आहे. यावेळी अश्या अधिकाऱ्यास त्वरित निलंबन करावे अशी मागणी योगेश पवार, जितेंद्र पाटील यांनी केली असून जिल्ह्यातून दिव्यांग बांधवांचा या विषयाला जोरदार पाठिंबा मिळत आहे.




