
प्रांताधिकारी यांना अर्ज देत जीवाचे बरे वाईट करून घेण्याचा दिला इशारा…
अमळनेर:- तालुक्यातील प्र. डांगरी येथील शेतकऱ्याची फळ बागायतीच्या नावाने फसवणूक झाल्याने प्रांताधिकारी यांना अर्ज देत जाचातून मुक्तता न झाल्यास जीवाचे बरे वाईट करून घेण्याचा इशारा दिला आहे.
अर्जदार दिलीप काशिनाथ पाटील यांनी प्रांतांना दिलेल्या अर्जानुसार तालुक्यातील प्र. डांगरी शेतशिवारात वडिलोपार्जित एकत्रित ग.न.510 येथे शेतजमिन आहे. या शेतजमिनीवर फळ बागायत करण्याचे आमिष दाखवत धनराज आबा व उमेश चौधरी दोघे रा.फागणे ता.जि.धुळे आणि दिनेश भावराव शिसोदे रा.प्र. डांगरी यांनी फसवणूक केली आहे. सदर अर्जदार मूळ प्र.डांगरी येथील असून नोकरी निमित्ताने बदलापूर येथे स्थायिक झाले आहे. दीड वर्षापूर्वी गावी कामकाजासाठी आले तेव्हा संबंधित तिघांनी स्वतःहून संपर्क साधत वडिलोपार्जित एकत्रित जमिन ग.न.510 वर फळ बागायती करण्याची केवळ तोंडी बोलणी केली. त्यानंतर अर्जदार गावाहून बदलापूर येथे परतले. कोरोना संसर्ग, एसटी महामंडळाचा संप व पती-पत्नीच्या उतारवयातील आजारपणामुळे पुन्हा गावाकडे येणे शक्य झाले नाही. या कालावधीत या मंडळींनी अर्जदारांच्या भावांचा व भावजायांच्या अज्ञानीपणाचा फायदा उठवत शेती ताब्यात घेतली. त्यांनतर दीड वर्षाच्या कालावधीनंतर गावाकडे आले असता शेतात गेल्यावर अर्जदाराच्या सुपीक जमिनीचे संबंधितांनी मातेरे केलेले दृश्य दिसून आले. या सुपीक जमिनीला कुरण करून तेथे गुरेढोरे चरताना दिसली. अर्जदाराला अंधारात ठेऊन संबंधित सर्वांनी परस्पर हा कारभार केला. यासंदर्भात कोणतीही लिखापढी, करार झालेला नाही. संबंधितांनी अर्जदाराच्या उपरोक्ष शेती ताब्यात घेतली मात्र तोंडी ठरल्यानुसार दोन वर्षांची झाडे न लावता रोप लागवड केली. शेतात बोअरवेल न करता दुसर्या शेतकर्याकडून पाणी आणले. आंतरपिकासाठी कोणतीही तजवीज केली नाही. शेताची लेवलिंग न करता तसाच वापर केला. मोठमोठे गवत वाढवून शेताचा उपयोग गायचरण म्हणून केला. रोपांचे जतन, संगोपन व संवर्धन केले नाही. जमिनीचे अजून मातेरे होऊन ती नापिक होऊ नये म्हणून अर्जदाराने हिस्याची 2 हेक्टर 75 आर एवढी शेतजमिन स्वतः कसण्यासाठी लेवलिंग वैगेरेचे काम हाती घेतले. मात्र, हे काम संबंधितांनी दमदाटी करून रोखले. शेतात कामासाठी आलेल्या मजुरांनाही दादागिरी दाखवून पिटाळून लावले जाते. शेती परत पाहिजे असल्यास लाखो रूपयांची अवाजवी मागणी करण्यात येते. याप्रकारामुळे संबंधितांच्या जाचातून मुक्त करण्याची आर्जव प्रांताकडे कडे करत असून तरी न्याय देऊन दिलासा द्यावा. अन्यथा जाचाला कंटाळून जीवाचे बरेवाईट करून घेईल, असा इशारा दिलीप काशिनाथ पाटील यांनी निवेदनात दिला आहे.