
अमळनेर:- तालुक्यातील मारवड, येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने शहीद दिनानिमित्त क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक सागर कोळी याने केले, तर प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले. याप्रसंगी प्राचार्य देसले व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. डॉ. कदम यांनी आपल्या प्रास्ताविकातून भगतसिंगांच्या विचारांची प्रासंगिकता मांडली. तद्नंतर प्राचार्य डॉ वसंत देसले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील भगतसिंगांच्या योगदानाबद्दल प्रकाश टाकून आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांचा आपल्या जीवनात आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन केले. यानंतर शहिद भगतसिंगांचे क्रांती काव्य सागर कोळी याने म्हटले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वयंसेवीका विद्यार्थीनी ज्योत्स्ना निकम हीने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.







