
अमळनेर:- विधानसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांकडून व त्यांच्या पालकांकडून संकल्प पत्र भरून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सर्व शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.

लोकशाही बळकट करण्यासाठी, निवडणूका शांततेत, कायदा व सुव्यस्थेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व इतर कर्मचारी प्रलोभनमुक्त, दबावविरहित मतदानासाठी प्रयत्न करीत आहेत.
काय आहे संकल्प पत्रात ?
प्रिय आई बाबा,
मला ठाऊक आहे की तुम्ही माझ्यावर खुप प्रेम करता. माझे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी तुम्ही दिवस-रात्र परिश्रम करत आहात. माझे भविष्य देशाच्या मजबुत लोकशाहीशी जोडलेले आहे. यासाठी मी तुम्हाला एक संकल्प करायला लावणार आहे. अमळनेर मतदार संघाच्या विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये तुम्ही दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी तुमचे अनमोल मत द्यायला जरुर जायचे आहे. मला विश्वास आहे की तुम्ही हा संकल्प निश्चित पूर्ण करणार.
तुमचा प्रिय मुलगा/मुलगी (सही)
आई-वडिलांचा संकल्प
आम्ही असा संकल्प करतो की, आम्ही, भारताचे नागरीक लोकशाहीवर निष्ठा ठेऊन आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांचे पावित्र्य राखू. या निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु. तसेच आमच्या कुटुंबातील सर्व मतदार, शेजारी व मित्र परिवार यांना देखील मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करु.
आई वडिलांचे नाव
अशा पद्धतीचे संकल्प पत्र पालक व विद्यार्थ्यांकडून भरून घेतले जाणार आहे.
प्रतिक्रिया
अमळनेर तालुक्यात इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत सुमारे ५२ हजार विद्यार्थी आहेत. दिवाळीची सुट्टी असली तरी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन संकल्प पत्र भरून घेणार आहेत.-रावसाहेब मांगो पाटील, गटशिक्षणाधिकारी, अमळनेर
प्रतिक्रिया
३० ऑक्टोबर रोजी मतदान जनजागृती महारॅली काढण्यात येणार आहे. मतदारांच्या मोबाईल मध्ये वोटर हेल्पलाईन अँप नोंदणी करण्यात येईल. रांगोळी , मेहंदी मानवी साखळी आदी उपक्रम राबवले जातील.- नितीन मुंडावरे, उपविभागीय अधिकारी अमळनेर

