
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीप्रकरणी दोघांना मार लागला असून दुसऱ्या गटातर्फे तीन जणांविरुद्ध फिर्याद देण्यात आली आहे.
फिर्यादी ज्ञानेश्वर एकनाथ बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २१ रोजी त्यांचा मुलगा योगेश व प्रशांत हे शेतात काम करत असताना शेजारील शेतकरी रवींद्र बडगुजर याने त्यांना सांगितले की, मशागत करताना तुझे बैल आमच्या शेतात यायला नको, त्यावर योगेश याने त्यास “तुमची बैलजोडी मशागत सुरू असताना आमच्या शेतात आली होती. आमचे बैल ही तुमच्या शेतात येतील, असे सांगितले.” त्याचा राग आल्याने रवींद्र याने शिवीगाळ केली व निघून गेला. त्यानतंर फिर्यादी व त्याचा भाऊ आत्माराम एकनाथ बडगुजर हे शेतात रवींद्र यास समजावण्यासाठी गेले असता त्यावेळी रविंद्रसह त्याची मुले घनशाम आणि गिरीश ही आली व तू काय दादागिरी दाखवतो असे म्हणत तिघांनी फिर्यादी व त्याच्या भावाला मारहाण केली. त्यात फिर्यादीचे डोके फुटले असून त्याच्या भावाच्या नाकाला दुखापत झाली आहे. दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर त्यांनी मारवड पोलीसात रवींद्र बडगुजर, घनशाम बडगुजर, व गिरीश बडगुजर यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून मारवड पोलिसांत भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो ना सुनील तेली हे करीत आहेत.







