
अमळनेरात सत्कार सोहळ्याचीही जय्यत तयारी
अमळनेर-विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अजून राहिलेली असताना मतमोजणीच्या पूर्वसंध्येलाच “तिलक हमी लगायेगे “या मथळ्याखाली मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या अभिनंदनाचे फलक लागले असुन मंत्रीच्या निवासस्थानी देखील सत्कार सोहळ्यासाठी भव्य शामियाना टाकून जय्यत तयारी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे,यामुळे महायुतीचे कार्यकर्ते कमालीचे सुखावले आहेत.

अमळनेर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील, अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी,आणि काँग्रेसचे डॉ अनिल शिंदे यांच्यात लढत झाली असून तिघांनीही विजयाचा दावा केला आहे.मात्र ग्रामीण व शहरी भागाच्या सर्व्हेनुसार मंत्री अनिल पाटील यांना विजयाचा आत्मविश्वास वाढुन कार्यकर्त्यांना देखील त्यांनी उत्साहित केले आहे त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते गुलाल तर आम्हीच उडविणार यासारखे संदेश सोशल मीडियावर टाकून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.सामाजिक कार्यकर्ते राजसिंग परदेशी व तुळशीराम हटकर यांनी महाराणा प्रताप चौकात मंत्री अनिल पाटील यांचे अभिनंदन करणारे मोठे होल्डिंग लावुन एकप्रकारे विजय अनिल पाटील यांचाच हाच संदेश दिल्याने संपूर्ण मतदारसंघात हा चर्चेचा विषय ठरला आहे.काही कार्यकर्त्यानी आम्ही चार ट्रक गुलाल देखील बुक केला असल्याचे सांगितले आहे.एकंदरीत महायुतीच्या गटात असलेला हा उत्साह तथा आत्मविश्वास आजच्या निकालानंतरच खरा ठरणार आहे.
दरम्यान दुसरीकडे माजी आमदार शिरीष चौधरी व डॉ अनिल शिंदे यांच्या गटात विजयाची तयारी काय?याबाबत माहिती मिळू शकली नाही मात्र चौधरी गटाचे काही कार्यकर्ते सोशल मीडियावर विजयाचा संदेश देत आहेत.आजच्या निकालाची सर्वाना कमालीची उत्सुकता लागली आहे.

