अमळनेर : धर्म आणि भक्ती यात गुंतलेला व्यक्ती सर्वस्वाचा त्याग करू शकतो. अमळनेर तालुक्यातील गांधली येथील कुणाल नाना पाटील (वय १७) या तरुणाने १२ वी चे शिक्षण सोडून तब्बल १५ हजार किमी सायकलवर चार धाम आणि १२ ज्योतिर्लिंगाच्या प्रवासाला निघाला आहे.
कुणाल पाटील हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याच्या वडिलांकडे फक्त १ बिघा शेती आहे. त्याला लहान पणापासून धार्मिकतेची आवड आहे. त्याला भगवद्गीता तोंडी पाठ असून त्याने संपूर्ण रामायण आणि महाभारत वाचले आहे. तो दररोज सकाळी ४ वाजेला उठतो. भगवद्गीता वाचल्याशिवाय त्याचा दिनक्रम सुरू होत नाही. १ डिसेम्बर सकाळपासून त्याने सायकल प्रवासाला सुरुवात केली आहे. अनेकांचा विरोध झुगारून त्याने चार धाम आणि १२ जोतिर्लिंग दर्शन असा १५ हजार किमी प्रवास करण्याचे ठरवले. त्याच्या इच्छा शक्तीला दाद देत गावकऱ्यांनी गर्दी करत त्याला गावाबाहेर येऊन आनंदाने निरोप दिला.
अमळनेर येथे स्व उदय वाघ यांच्या स्मारकावर त्याने अभिवादन केले. आमदार अनिल पाटील यांनी त्याचे स्वागत करून प्रवासाबद्दल विचारपुस केली. अनिल पाटील यांच्यासह ,भावेश जैन व अनेकांनी त्याला आर्थिक मदत केली. जागोजागी त्याचे स्वागत करण्यात आले.
धार्मिक पर्यटनासाठी कुणाल याने १२ वी चे शिक्षण अर्ध्यावर सोडले असून त्याने १२ वि चा परीक्षेचा फॉर्म देखील भरला नाही. तो प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. कुणाल दररोज साधारण ३५ ते ४० किमी प्रवास करणार आहे. गांधली ,अमळनेर, धुळे , मालेगाव , वणी गड , नाशिक त्र्यंबकेश्वर , घृष्णेश्वर असा प्रवास करणार आहे. रस्त्यात मंदिर , मंगल कार्यालय ,धर्मशाळा जिथे योग्य वाटले तिथे तो थांबणार आहे. सामाजिक कार्यकर्ता अथवा संस्थांकडून जेवण मिळाले तर ठीक नाही तर जेवणाचे साहित्य स्टोव्ह सोबत घेतला आहे. तंबू टाकून स्वतःच स्वयंपाक करणार आहे. विशेष म्हणजे त्याने भगवद्गीता देखील सोबत घेतली आहे.
जात पात विसरून सर्वांनी फक्त हिंदू म्हणून जगावे, हिंदू ,सनातन धर्माच्या प्रचारासाठी जनजागृतीसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.– कुणाल नाना पाटील,गांधली ता. अमळनेर