यात्रेची जय्यत तयारी सुरू,सर्वाना सहभागी होण्याचे आवाहन…
अमळनेर– हिंदु नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त निघणारी स्वागत यात्रा यंदाच्या गुढीपाडव्याला दि 2 एप्रिल रोजी जल्लोषात निघणार असून याची जय्यत तयारी समितीमार्फत सुरू झाली आहे.
शहरातील राष्ट्रप्रेमी,धार्मिक व सामाजिक संस्थांच्या व मंडळाच्या सहकार्याने ही हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे.दि 2 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता बन्सीलाल पॅलेस येथून शोभयात्रेस सुरुवात होणार आहे,सदर शोभयात्रा प्रताप मिल येथून स्टेशन रोड,स्वामींनारायन चौक,सुभाष चौक,राणीलक्ष्मीबाई चौक,दगडी दरवाजा,तिरंगा चौक,कुंटे रोड,पवन चौक,झामी चौक, वड चौक,त्रिकोणी बाग, पाच पावली मंदिर,बस स्टँड,विजय मारुती मंदिर,महाराणा प्रताप चौक जवळील जि प विश्रामगृहात समारोप होणार आहे.
तरी सदर यात्रेच्या पार्श्वभूमीवर तमाम नागरिकांनी चैत्र शुद्ध प्रतिपदा,2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आपले प्रांगण झाडून,सडा शिंपडून रांगोळ्या काढाव्यात घरात रोषणाई करून घरात भव्य गुढी उभारावी तसेच पुष्पवृष्टी किंवा आपणास शक्य होईल त्यापद्धतीने शोभायात्रेचे स्वागत करावे,शिवाय मंगळवेश परिधान करून सहकुटुंब व मित्र मंडळीसह शोभयात्रेत सहभागी होऊन आनंद लुटावा आणि भारतीय पद्धतीने नववर्षाचे स्वागत करावे याशिवाय हिंदू बांधवानी आपल्या घरावर भगवा ध्वज उभारावा असे आवाहन स्वागत समितीतर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान दरवर्षी अमळनेरात गुढीपाडव्याला जल्लोषात निघणारी ही स्वागतयात्रा म्हणजे अमळनेर नगरीचे वैभव असून स्वागत यात्रेचे हे 16 वे वर्ष आहे,अतिशय मोठया संख्येने नागरिक यात सहभागी होत असतात, याठिकाणी विविध संस्था आणि मंडळाच्या वतीने करण्यात येणारे विविध देखावे स्वागत यात्रेचे आकर्षण ठरत असतात, दोन वर्षे कोरोना निर्बंधांमुळे या स्वागत यात्रेत खंड पडला असताना यंदा तेवढ्याच उत्साहाने ही स्वागत यात्रा निघत असल्याने हिंदू बांधवात कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे.