अन्यथा १ एप्रिल पासून रेशन दुकानदार मशीन करतील जमा…
अमळनेर:- धान्य वितरण करतेवेळी ई पॉस मशीनमध्ये विविध तांत्रिक अडचणी येत असून त्यावर मार्ग न निघाल्यास १ एप्रिल पासून रेशन दुकानदार मशीन तहसील कार्यालयात जमा करणार आहेत. अमळनेर स्वस्त धान्य दुकान संघटनेकडून तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सध्या महाराष्ट्रामध्ये तसेच संपुर्ण देशातच आधार सर्वरला सतत येत असलेल्या तांत्रिक समस्येमुळे तसेच आधार संलग्न सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत एन.आय.सी. नवी दिल्ली आणि हैद्राबाद येथील सर्वरवर येत असलेल्या अतिरिक्त ताणामुळे मागणी दोन – तीन महिन्यापासुन राज्यातील पॉश मशीनव्दारे होणारे धान्य वितरण विस्कळीत झाले आहे. ज्या दुकानांमध्ये प्रत्यक्ष धान्यसाठा उपलब्ध आहे. त्या दुकानांमध्ये प्रत्यक्ष धान्यसाठा पोहोच झालेलाच नाही यामुळे धान्य वितरण थांबलेले असून शिधापत्रिका धारकांमध्ये रेशन दुकानदारांविरोधात रोष आणि असंतोष वाढत चालला आहे. मुदत संपल्याने कालबाह्य झालेल्या ई – पॉझ मशीन्समुळे धान्य वितरणात नियमितता राहिलेली नाही. पॉश मशीनला सततच्या येणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे विशेषतः सर्वर डाऊन व आधार प्रमाणीकरण न होणे तसेच प्रधनमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य वाहतूक आणि वितरणाचा अतिरिक्त ताण यामुळे देखील धान्याचे ऑनलाईन वितरण वेळेत आणि मुदत वाढीनंतरही पूर्ण होऊ शकलेले नाही. तसेच ई – पॉझ मशीन ह्या कालबाह्य झालेल्या असून त्या टु – जी प्रकारातील असून सद्यःस्थितीत फोर – जी सुरु असून लवकरच फाईव्ह – जी सुध्दा सुरु होईल. त्या अनुषंगाने कालबाह्य झालेल्या ई – पॉझ मशीन बदलवून मिळणे, त्यावरील सीम कार्ड न चालणे, स्वस्त धान्य दुकानदार स्वतःच्या मोबाईलवरुन हॉटस्पॉटव्दारे ई – पॉझ मशीन चालवत असून त्याचाही भूर्दंड दुकानदारांना सहन करावा लागतो. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील थकीत कमिशन तात्काळ देण्यात यावे. या व अन्य प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास १ एप्रिल पासून तहसील कार्यालयात मशीन जमा करण्यात येणार आहेत. सदर निवेदनावर माजी तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, तालुकाध्यक्ष प्रवीण गोसावी, शहराध्यक्ष दिलीप सैनाणी यासह तालुक्यातील रेशन दुकानदारांच्या सह्या आहेत.