अमळनेर : एकीकडे महिला सक्षमीकरणासाठी शासन विविध सवलती व योजना जाहीर करत असताना तालुक्यातील जानवे या खेड्यातील अवघ्या सतरा वर्षांची तरुणी मोटरसायकलीवर धुळे व अमळनेर येथे दूध विक्रीसाठी आणून वडिलांच्या व्यवसायात हातभार लावत आहे. दीपक पाटलांसाठी त्यांची कन्या खऱ्या अर्थाने ‛भाग्यश्री’ ठरली आहे.
जानवे येथील दीपक मधुकर पाटील हे शेतीव्यवसाय करतात. त्यांच्या घरच्या दोन म्हशी असून यासह गावातील इतर म्हशींचे दूध संकलन करून दररोज सकाळी ८० लिटर आणि सायंकाळी ८० लिटर दूध विक्रीसाठी अमळनेर व धुळे येथे नेले जाते. दीपक पाटील सकाळी दूध स्वतः अमळनेर ला आणतात. मात्र सायंकाळी त्यांची अवघ्या १७ वर्षांची मुलगी भाग्यश्री एकटी मोटरसायकल ला दुधाचे कॅन टांगून विक्रीसाठी १२-१३ किमी अंतरावर अमळनेरला गुरुदत्त डेअरीवर आणते. भाग्यश्री अमळनेर येथील धनदायी महाविद्यालयात ११ वी चे शिक्षण घेत आहे. आपल्या वडिलांना व्यवसायात मदत व्हावी म्हणून दररोज सायंकाळी दूध आणण्याची जबाबदारी तिने घेतली आहे. अनेक वेळा ती एकटी दूध धुळ्याच्या दिलीप डेअरीवर देखील दूध विक्रीसाठी एकटी मोटरसायकलवर जाते.
शहरात महिला मुली सक्षम झाल्या असल्या ,स्वतःचे व्यवसाय करीत असल्या तरी ग्रामीण भागात मात्र अद्यापही मुलींना शिकू दिले जात नाही. अशात एकटीला घराबाहेर पडू दिले जात नाही. समाजाची अनेक बंधने तिच्यावर आहेत. मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याने पालकांची मुलींबद्दलची चिंता वाढली आहे. आजही महिला सुरक्षित नाहीत अशी ओरड समाजात होत असताना ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर भाग्यश्री धाडसाने एकटी सायंकाळी मोटरसायकलवर दूध विक्रीसाठी रोज २४ किमी प्रवास करते. तिला कशाचीही भीती वाटत नाही. नोकरीसाठी रडणाऱ्या बेरोजगार तरुण आणि शासनाकडे १५०० रुपये मानधनासाठी धडपड करणाऱ्या लाडक्या बहिणींपुढे भाग्यश्री निश्चितच आदर्श ठरणार आहे.
शालेय जीवनात कबड्डी खेळाची आवड होती. वडिलांना सकाळी शेतीचे काम असले तर सकाळी देखील ती मोटरसायकलवर दूध विक्रीसाठी अमळनेर ला आणते. पुढे पोलीस खात्यात भरती व्हायचा मनोदय भाग्यश्री हिने व्यक्त केला आहे.