पारोळ्यातील गतिमंद महिलेला दिला मायेचा ‘आधार’
अमळनेर:- पारोळा शहरातील मडक्या मारोती चौकातील रहिवासी माया महाजन (४३) ही गतिमंद महिला गेल्या २ दिवसापासून बेपत्ता होत्या. त्यांचे कुटूंबीय सर्वत्र शोध घेत होते. अश्यात ही महिला जळोद ता.अमळनेर ला पोचले. तिथे त्यांची आस्थेवाईक पणे चौकशी करून कुटूंबियांची भेट सोशल मीडियाच्या आधारे पोलीस पाटील भारती पाटील यांनी घडवून आणली आहे. त्यांच्या या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पारोळा शहरातील मडक्या मारोती चौकातील रहिवासी माया आनंदा महाजन (४३) ह्या गतिमंद महिला गेल्या २ दिवसापासून घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचे बंधू चंद्रकांत आनंदा महाजन सह कुटूंबीय सर्वत्र शोध घेत होते. ही गतिमंद महिला जळोद (ता. अमळनेर) येथे पोचल्या तेथे ही महिला पूर्ण गावात भटकंती करीत होती. अनोळखी असल्याने ही महिला कोण? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता. ही महिला एवढ्या थंडीत तिथेच एका ओट्याच्या आडोश्याला रात्री झोपत होती. अशी माहिती मिळताच जळोद’च्या पोलीस पाटील भारती पाटील यांनी या महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी करीत जेवणाची झोपण्याची व्यवस्था लावून सोशल मिडियाचा आधार घेवून या महिलेच्या कुटूंबियांची भेट घडवून आणली आहे.
सोशल मीडियाच्या मदतीने ‘त्या’ महिलेची घरवापसी
जळोद’च्या पोलीस पाटील भारती पाटील यांनी हरविलेल्या गतिमंद महिला माया आनंदा महाजन यांच्या नावानिशी बोलका व्हिडीओ व्हाट्सप या समाज माध्यमावर व्हायरल केला. हा व्हिडीओ त्या महिलेच्या कुटूंबीय पर्यंत पोहचला. तसेच पारोळा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार यांनी देखील हा व्हिडीओ कुटूंबिया पर्यत पोहचण्यास मदत केली. त्यामुळे कुटूंबियांची भेट घडून त्या महिलेची घरवापसी झाली. पोलीस पाटील जळोद ता.अमळनेर येथील भारती पाटील यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक करून महाजन परिवाराने आभार मानले.