सर्व सामाजिक,राजकीय पक्षांनी सामील होण्याचे केले आवाहन…
अमळनेर:- येथील भीम आर्मी शाखेतर्फे ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या याकरिता तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला एक हाती सत्ता मिळाल्याने व आघाडीचा सुपडा साफ झाल्याने ईव्हीएम मशीनमध्ये गडबडी झाल्याच्या चर्चेला राज्यात उधाण आले आहे.अनेक तज्ञांनी शंका उपस्थित करून निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.त्यातच देशातील सर्वात मोठा पक्ष काँग्रेस व महाविकास आघाडीतील घटक पक्षात ईव्हीएम बाबत मोठ्या प्रमाणावर शंका उपस्थित केली जात असून काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकतेच दिल्ली येथील जंतर मंतर येथे ई व्ही एम विरोधात मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या म्हणून केंद्र सरकार कडे मागणी केली आहे तसेच देशभर भारत जोडो अभियान सारखे संपूर्ण देशात ईव्हींएम एवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन लोकशाही वाचविण्यासाठी जनतेत जागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचे श्री खरगे यांनी सूतोवाच केले आहे.याच प्रमाणे देशातील प्रादेशिक पक्ष हे सुध्दा ईव्हींएम मशीन एवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या म्हणून आग्रही भूमिका आंदोलन करीत मांडताना दिसत आहेत. एकंदरीत ईव्हींएम मशीन विरोधात संपूर्ण राजकीय व लोकशाही प्रेमी सामाजिक संघटनानी प्रखर पावित्र्या घेतल्याचे दिसून येत आहे.याचाच एक भाग म्हणून अमळनेर येथील भीम आर्मी या संघटनेच्या माध्यमातून लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हींएम मशीन विरोधात धरणे आंदोलन दिनांक ६ डिसेंबर रोजी तहसील कार्यालया समोर सकाळी ११ ते ३ वाजे पर्यंत करणार असल्याचे आयोजकांनी पत्राद्वारे माहिती दिली असून या धरणे आंदोलनाच्या प्रसंगी लोकशाही व संविधान प्रेमी नागरिक तथा राजकीय पक्षांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक कृष्णकांत शिरसाठ यांनी केले आहे.