अमळनेर:- येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे मा.शंभू पाटील निर्मित व दिग्दर्शित सुप्रसिद्ध रंगकर्मी हर्षल पाटील यांची प्रमुख भूमिका असलेले लेखक दि बा मोकाशी लिखित “पालखी” या नाटकाने खच्चून भरलेल्या नाट्यगृहातील हजारो रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले.
जळगाव येथील आर.सी.बाफना ज्वेलर्सच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संचालक सुशीलकुमार बाफना व श्रीमती नयनतारा बाफना यांनी “पालखी” नाटकासाठी प्रायोजकत्व स्वीकारून सहकार्य केले.४० पेक्षा अधिक नाट्य कलाकार असलेल्या पालखी या नाटकाने प्रति पंढरपूर असलेल्या अमळनेर करांना वारीचा जिवंत अनुभव देत वारकऱ्यांमधील विठ्ठलाचे दर्शन घडविल्याने अमळनेरकर रसिकांनी नाटकास व कलाकारांना भरभरून दाद दिली.
याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी याप्रसंगी अमळनेरकरांच्या रसिकतेला सलाम करीत अबाल वृद्ध व दर्दी प्रेक्षकांचे आभार मानले. सदर नाट्यप्रयोग पाहण्यासाठी सभागृहात अमळनेरातील राजकीय शैक्षणिक सहकार व सामाजिक क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाटकाच्या यशस्वीतेसाठी संयोजन सहकार्य समितीतील धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.लिलाधर पाटील, साने गुरुजी वाचनालय ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, भाऊसाहेब देशमुख, अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, माजी नगरसेवक श्याम पाटील, डॉ.अविनाश जोशी, प्रकाश वाघ, संदिप घोरपडे यांच्यासह आर सी बाफना ज्वेलर्सचे मनोहर पाटील तसेच पूज्य साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी, राजमुद्रा फाउंडेशनचे कार्यकर्त्यांसह बापूराव ठाकरे,रामेश्वर भदाणे प्रयत्न केले.