नगरपालिकेच्या विनंतीवरून सोलर लॅम्प व वृक्षलागवड
अमळनेर : विप्रो कंपनीच्या सीएसआर निधीतून व आधार संस्थेच्या मदतीने शहरातील सुभाष चौक ते सानेनगर दरम्यान सोलर लॅम्प आणि वामननगर मध्ये मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करून पर्यावरण समृद्ध आणि सुंदर अमळनेर करण्याचा प्रयत्न केला आहे.
अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभाग हरित ऊर्जेवर अवलंबित पथदर्शी प्रकल्प राबवत आहेत. तत्कालीन विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर यांनी विप्रोचे प्रकल्प संयोजक यांच्याकडे सीएसआर फंडातून सोलर पथदिवे लावण्याकरिता पाठपुरावा केला होता. विप्रोचे अमळनेर हे मदर युनिट असून अमळनेरचे आपण देणे लागतो या भावनेने कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला. पालिकेच्या पाठपुराव्याने आधार संस्थेच्या सहकार्याने सुभाष चौक ते सानेनगर पर्यंत सोलर पथदिवे लावणे सुरू झाले. रस्ते प्रकाशमान होऊन विद्युत ऊर्जेची बचत झाली आहे.
त्याचप्रमाणे पिंपळे रस्त्यावरील वामन नगर मधील खुल्या भूखंडात मियावाकी पद्धतीने हजारो झाडे लावण्यात येणार आहेत. परिसरातील सौंदर्यात भर पडून ऑक्सिजन प्रमाण वाढणार आहे.
यासाठी विप्रोचे मानव प्रकल्प संयोजक व्यवस्थापक चेतन थोरात , वित्त व्यवस्थापक आंनद निकम , वरिष्ठ महाव्यवस्थापक तथा प्लांट हेड विजय बागजिलेवाले , आधार संस्थेचे भारती पाटील ,रेणू प्रसाद,विजय वाघमारे , विद्युत अभियंता कुणाल महाले ,बांधकाम अभियंता डिगंबर वाघ , सुनील पाटील ,आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे , किरण कंडारे, आबीद शेख व पालिका कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.
प्रतिक्रिया
हरित ऊर्जा ,पर्यावरण संवर्धन , ऊर्जा बचत यावर पालिकेने लक्ष केंद्रित करून सीएसआर , लोकसहभाग , शासन निधी यातून सुंदर व स्वच्छ अमळनेर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.- तुषार नेरकर ,मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद