
सद्गुरू टॅक्सी जीप युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेला दिले निवेदन
अमळनेर:- येथील बसस्थानक परिसराच्या बाहेरच असलेला एक पिंपळाचा वृक्ष जीर्ण झाला असून, त्यामुळे येणाऱ्या काळात जीवित अथवा इतर प्रकारचे संकट उदभवू शकते. या वृक्षाला तोडण्याची कार्यवाही पालिकेने करावी अशी विनंती सदगुरू जीप टॅक्सी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

अमळनेर बस स्थानकाला लागूनच असलेल्या परिसरात हा पिंपळाचा वृक्ष असून तो अतिशय जीर्ण झाला आहे. शहरातून जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने दिवसभर या रस्त्यावर वाहनांची तसेच पायी चालणाऱ्या लोकांची वर्दळ असते.याच भागात टॅक्सी स्टँड असल्याने अनेक टॅक्सी व प्रवासी त्या झाडाखाली उभे असतात. पावसाळ्यात अनेकदा या जीर्ण झाडाच्या फांद्या मुख्य रस्त्यावर पडल्याने अपघात झाले असल्याचे पत्रात म्हटले आहे.येणाऱ्या काळात घटना घडल्यास त्याला पालिका जबाबदार असून पालिकेला वारंवार पत्रव्यवहार केला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले असून त्यामुळे हे झाड तोडावे यासाठी सद्गुरू टॅक्सी जीप युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर सतिष बागुल, आबा चौधरी,विनोद पाटील,पप्पू धनगर सोबतच नागरिकांच्या सह्या आहेत

