दौलताबाद येथील फरार नवरी सापडली अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे..
अमळनेर:- तालुक्यातील शिरूड येथे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूचे बिंग फुटले असून १० दिवसापूर्वीच तिचे लग्न झाले असून तेथून ती दागिन्यांसह फरार असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नासाठी मुलगी तयार असल्याची माहिती देवून त्यासाठी लाखो रुपये घ्यायचे आणि लग्न झाल्यानंतर नवरदेव आणि सासरच्यांना लुटून पळून जाणाऱ्या मुलींचे रॅकेट मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे.
26 मार्च 2022 रोजी दौलताबाद येथील दत्तमंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पडलं. लग्नासाठी नवरदेवाच्या नातेवाईकांनी मुलींच्या नातेवाईकांना एक लाख तीस हजार रुपये रोख दिले, तसेच लग्नात नवरी मुलीच्या अंगावर 70 हजार रुपयांचे दागिने घातले. लग्न देखील मुलाकडे करा असा आग्रह नातेवाईकांनी केला. लग्नानंतर तिसऱ्या दिवशी दौलताबाद किल्ल्यावर पर्यटनासाठी गेली असता नवरी नवरदेवाला सोडून फरार झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना 29 मार्च रोजी घडली असून या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. कुठली ओळख नसताना केवळ मध्यस्थीने विवाह झाला. घरात दागिने आणि पैशांची फसवणूक झाल्याने नवरदेवाकडील मंडळी संताप व्यक्त करत आहेत. लग्नाचे खोटे नाटक करून 1लाख 30 हजार रुपये लुबाडून 70 हजारांचे दागिने घेऊन फरार झाल्याची तक्रार दौलताबाद पोलिस ठाण्यात नवरदेवाने दिली आहे.
अन 11 व्या दिवशी दलालांमार्फत दुसरं लग्न, नवरीचा प्रताप उघड होताच तोंड ठोकून घेण्याची आली पाळी…
पहिल्या लग्नाला दहा दिवस होताच अकराव्या दिवशी पुन्हा त्याच मुलीचे लग्न मध्यस्थीच्या माध्यमातून मोठी रक्कम घेत लग्न जुळवून आणून त्या मुलीला अमळनेर तालुक्यातील शिरुड गावात देण्यात आले. यासाठी देखील दोन लाखापेक्षा अधिक पैसे मोजून दिले असल्याचे मुलाकडच्या नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी लग्न लागल्यानंतर देखील लग्नाच्या स्टेजवर पैशांवरून राडा झाल्याची माहिती मिळाली. पण तो वाद आपसात मिटला. दुसऱ्या दिवशी या मुलीचे काही दिवसांपूर्वी एका ठिकाणी लग्न पार पडले असल्याचा प्रकार व्हिडिओ बातमीच्या माध्यमातून उघडकीस आला. त्याक्षणी या नवरदेव व त्याच्या नातेवाईकांची पायाखालची वाळू सरकली. नुकतेच अकरा दिवसांपूर्वी या तरुणीचे लग्न झाले आहे. याबाबत गावात बोंब फुटली आणि पुन्हा गावात चर्चांना ऊत आला. दलालांमुळे गरीब परिवाराला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. पुढे सर्व प्रकरणाकडे बघता लग्नाच्या संबंधांमध्ये एजंट लोकांकडून मागण्यात येणारा पैसा आणि त्यानंतरची होणारी फसवेगिरी, यामुळे नवरदेव आणि त्याच्या घरच्यांवर मात्र डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत दिलेले पैसे परत मिळत नाही तोपर्यंत नवरी व तिच्या नातेवाईकांना गावातच ठेवल्याची भूमिका घेतली होती मात्र दिलेले पैसे परत मिळाल्याने पोलीसात तक्रार न देता त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.