
भंगारवाल्याकडून पोलिसांनी जप्त केला १९ लाखाचा मुद्देमाल…
अमळनेर:- तालुक्यातील अंचलवाडी येथून पोकलँड मशीन चोरणाऱ्या चोरट्यासह भंगारवाल्यास अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंचलवाडी येथे पावसामुळे डांबरीकरणाचे काम बंद झाल्याने ठेकेदार राज पाटील यांनी गावापासून काही अंतरावर १४ लाख किमतीचे पोकलँड रस्त्याच्या कडेला लावून ठेवले होते. अज्ञात चोरट्याने ते चोरुन नेल्याने अमळनेर पोलीसात २९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तपास अधिकारी व पथकाने केलेल्या तपासाच्या आधारे सदर मशीन हे नवनीत देवाजी पाटील (रा. बाभूळगाव ता. शिंदखेडा) याने चोरुन नेल्याचे स्पष्ट झाले होते. त्याआधारे त्यास अटक करत न्यायालयात हजर केले असता २ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच १ ऑगस्ट रोजी मशीन विकलेल्या भंगारवाल्याकडे धुळे येथे अमळनेर पोलिसांनी छापा टाकला असता त्याच्याकडून ३ लाख किमतीचे पोकलँड मशीनचे स्पेअर पार्ट व इंजिन, १० लाख रुपयाचा ट्रक, व चोरीसाठी वापरलेली ६ लाख रु. किमतीची कार असा १९ लाखाचा मुद्देमाल जप्त करत भंगार दुकान मालक हजरतउल्ला उर्फ राजू रहमतउल्ला खान यास अटक करण्यात आली. सदर घटनेचा तपास पो. नि. जयपाल हिरे, पो.हे. कॉ. किशोर पाटील, सुनील हटकर, पो.ना रवींद्र पाटील, दीपक माळी, कैलास शिंदे, पो. कॉ. भूषण पाटील यांच्या पथकाने केला.




